"बाबांचा अभिमान वाटतोय..." 'क्रांतिज्योती विद्यालय'मधील वडिलांचा डान्स पाहून भारावला चैतन्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:16 IST2026-01-02T11:16:42+5:302026-01-02T11:16:59+5:30
चैतन्यने 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा सिनेमा पाहिल्यावर आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली.

"बाबांचा अभिमान वाटतोय..." 'क्रांतिज्योती विद्यालय'मधील वडिलांचा डान्स पाहून भारावला चैतन्य
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील टीआरपीच्या शर्यतीत असलेली लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'ठरलं तर मग'मधील सायली-अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याबरोबरच अर्जुनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या चैतन्यलादेखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. चैतन्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टसोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही तो चाहत्यांना देतो. आता चैतन्यनं त्याच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
तुम्हाला माहितेय का चैतन्य हा ज्येष्ठ अभिनेते धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे. नुकतंच धनंजय सरदेशपांडे हे लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमेच्या 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. काल १ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील 'स्वर्गात आकाशगंगा' हे गाणं लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात चैतन्यचे वडिल धनंजय सरदेशपांडे हे हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह डान्स करताना दिसलेत. आपल्या वडिलांचा हा डान्स पाहून चैतन्य प्रचंड आनंदी झाला.
वडिलांचा हा गोड डान्स पाहून चैतन्यने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, "मी नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी सिनेमा पाहिला. या सिनेमाचं नाव आहे 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम'. या चित्रपटात एक फार गोड गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे बाबांचा डान्स! मला त्यांचा खूप अभिमान वाटतोय. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांचे मी मनापासून आभार मानतो. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबांना वेगळं काहीतरी करता आलं. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम".
वडिलांच्या पावलावर पाऊल...
धनंजय सरदेशपांडे हे १९८४ पासून कार्यरत एक ज्येष्ठ मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते व लेखक आहेत. 'चंद्रविलास' मालिकेतील नाना आणि 'मुंजा' चित्रपटातील भूमिकेसाठी ते प्रसिद्ध असून त्यांनी भाडिपा सोबतही काम केले आहे. भाडिपाच्या 'झूम', 'B.E. रोजगार' या सीरिजमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. चैतन्यने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं. 'ठरलं तर मग' व्यतिरिक्त त्याने 'अल्टी पलटी सुमडीत कल्टी' आणि 'दुनियादारी फिल्मी स्टाइल' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.