'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीही झालीये फसवणूक, ५ लाख घेतले परत दिलेच नाहीत; शशांकच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:51 IST2026-01-06T12:50:15+5:302026-01-06T12:51:13+5:30
शशांकप्रमाणेच इतर अन्य कलाकारांनीही त्यांचे अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडून फसवणूक झाल्याचं म्हणत नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीही झालीये फसवणूक, ५ लाख घेतले परत दिलेच नाहीत; शशांकच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली...
सध्या मराठी सिनेसृष्टीत नाराजीचा सूर उमटल्याचं दिसत आहे. अभिनेता शशांक केतकरने मन हे बावरेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेल्या मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. शशांकने त्याच्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ आणि मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत ५ लाख रुपये बुडवल्याचं म्हटलं आहे. वारंवार मागणी करूनही गेल्या ५ वर्षांपासून एकही रुपया न मिळाल्याने संतप्त झालेल्या शशांकने मंदार देवस्थळींविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. शशांकला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे.
शशांकप्रमाणेच इतर अन्य कलाकारांनीही त्यांचे अनुभव कमेंटमध्ये शेअर केले आहेत. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनीही एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडून फसवणूक झाल्याचं म्हणत नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. त्या अभिनेत्रीने प्राजक्ता दिघे यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले पण ४ वर्ष झाली तरी अजूनही त्यातला एकही रुपया परत केला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शशांकच्या पोस्टवर प्राजक्ता दिघे यांनी कमेंट करत म्हटलं आहे की "शशांक तू एकदम बरोबर केलं आहेस. आपल्या इंडस्ट्रीमध्ये नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच माणस बरीच आहेत. माझे सुद्धा एका मराठी अभिनेत्रीने जिचं सोज्वळ-ताई म्हणून नाव खूप मोठं आहे, लोकांचे पैसे द्यायचे आहेत म्हणून २-३ महिन्यात परत देईन म्हणून ५ लाख घेतले आहेत आणि आज ४ वर्ष झाली तरी पैसे परत करत नाहीये. गोष्टी मात्र करोडमध्ये करते पण फक्त बाता...मैत्रीण आहे म्हणून गरजेला दिले पण आता माझा मैत्रीवरचा विश्वास उडाला".