ठाण्याच्या वाहतुक कोंडीवर तेजश्री प्रधानचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, फडणवीसांचं उत्तर ऐकून झाला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:55 IST2026-01-08T12:54:38+5:302026-01-08T12:55:37+5:30
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं प्लॅनिंग ऐकून तेजश्रीला झाला आनंद

ठाण्याच्या वाहतुक कोंडीवर तेजश्री प्रधानचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, फडणवीसांचं उत्तर ऐकून झाला आनंद
सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रत्येक राजकीय पक्ष मैदानात उतरुन काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच ठाणे शहरात आले होते. यावेळी स्थानिक वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानने फडणवीसांची मुलाखत घेतली. यावेळी तिने ठाण्यातील वाहतुकीच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं प्लॅनिंग ऐकून तिला आनंद झाला.
तेजश्री प्रधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाली, " मी गोरेगावात राहत होते. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात शिफ्ट झाले. कारण माझी जी मालिका सुरु आहे त्याचं शूट ठाण्यात असतं. प्रवासाच्या दृष्टीने ठाणे लांब लांब जात राहतं याचं कारण म्हणजे इथे होणारी वाहतूक कोंडी. तर यासाठी तुम्ही काही प्लॅनिंग केलं आहे का?
यावर फडणवीस म्हणाले, "ठाणे किंवा एमएमआरचं क्षेत्र यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे. मी नेहमी म्हणतो की मुंबई ते एमएमआर क्षेत्रात दोन मोठे प्रश्न आहेत..एक म्हणजे लोकांच्या राहण्याचा आणि दुसरा वाहतुकीचा. हे प्रश्न सोडवले तर खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असं मानता येईल. ठाण्यात दळणवळणाच्या दृष्टीने आपण अनेक गोष्टी केल्या आहेत. विशेषत: मुंबईत जुन्या सरकारच्या काळात त्यांनी ११ वर्षात ११ किलोमीटरची मेट्रो केली. २०१४ नंतर जेव्हा माझ्याकडे कार्यभार आला तेव्हा आम्ही ५ वर्षात ४७५ किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं. याचं काम सुरु केलं. मध्येच कामात स्थगिती आली. पण पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही वेगाने काम सुरु केलं. आज जवळपास २०० किमीचं काम पूर्ण झालं आहे. दरवर्षी ५० किमीचं काम आम्ही करणार आहोत. हे ४७५ किमीपैकी जवळपास ४०० किमी हे २०२८ च्या शेवटी किंवा २०२९ पर्यंत आम्ही करणार आहोत. २०३० पर्यंत सगळं नेटवर्क आम्ही करु."
"यामध्ये ठाण्याला मोठी कनेक्टिव्हिटी दिली आहे. मुंबई आणि कल्याण-भिवंडीकडेही जोडलेलं आहे. ३ ते ५ मेट्रो ठाण्याशी कनेक्ट केल्या आहेत. सोबत ठाण्याच्या रिंग मेट्रोचा सुद्धा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे ठाणे हे पहिलं शहर असेल जिथे रिंग मेट्रो आपण करणार आहोत."