तेजश्री प्रधान दरवर्षी दिवाळीत 'ही' एक खास परंपरा आवर्जून जपते, खुलासा करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:09 IST2025-10-17T19:09:14+5:302025-10-17T19:09:58+5:30
Tejashree Pradhan : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना'मधील स्वानंदी ही भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान हिने यंदाच्या दिवाळीनिमित्त आठवणींना उजाळा दिला.

तेजश्री प्रधान दरवर्षी दिवाळीत 'ही' एक खास परंपरा आवर्जून जपते, खुलासा करत म्हणाली...
प्रकाश, आनंद आणि आठवणींनी भरलेला सण म्हणजे दिवाळी. या निमित्ताने सगळीकडे उजळून निघालेलं वातावरण, फराळाच्या चविष्ट पंगती, आणि कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांमधील गोडवा यामुळे दिवाळी खास ठरते. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाची एक खास आठवण असते आणि कलाकारही त्याला अपवाद नाहीत. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना'मधील स्वानंदी ही भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान हिने यंदाच्या दिवाळीनिमित्त आठवणींना उजाळा दिला.
दिवाळीतील फटाके आणि फराळाच्या संदर्भात बोलताना तेजश्री म्हणाली, "मला वाटतं मी फुलबाजीसारखी आहे. ती तड तड आवाज करत प्रकाश देते, पण त्याच वेळी शांततेची अनुभूतीही देते. ती हळूहळू मंद होत जाते. फराळाच्या पदार्थांबाबत विचारल्यावर तेजश्रीने म्हणते "माझ्या मते, मी चिवड्यासारखी आहे. बाकीच्या फराळाच्या पदार्थांपेक्षा तो थोडा हेल्दी असतो आणि त्यात बऱ्याच गोष्टींचं मिश्रण असतं. त्याप्रमाणे मी ही अनेक विषयांवर बोलते आणि लोकांच्या मनाला आधार देते."
दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना ती म्हणाली, "मी प्रत्येक दिवाळी कुटुंब आणि मित्रांमध्ये साजरी केली आहे आणि यंदाही त्यांच्याबरोबरच दिवाळी घालवणार आहे. दिवाळीत एक खास परंपरा आवर्जून जपते ती म्हणजे घरासमोर खूप सारे दिवे लावणं आणि सर्वत्र प्रकाश व आनंद पसरवणं." तेजश्री प्रधान हिच्या या मनमिळावू आणि अंतर्मुख विचारांनी दिवाळीच्या सणाला अजून एक सुंदर पैलू मिळतो जिथे प्रत्येक फुलबाजीचा प्रकाश आणि चिवड्याची उब आपल्या नात्यांमध्ये सौंदर्य फुलवत जाते.