"आडनावामुळे रिजेक्ट केलं...", 'तारक मेहता...'च्या सोनालिका कांबळे जोशीने सांगितली मराठी इंडस्ट्रीची दुसरी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:36 IST2025-08-26T16:34:44+5:302025-08-26T16:36:08+5:30
सुरुवातीच्या काळात मराठी इंडस्ट्रीत सोनालिकाला वाईट वागणूक मिळाली. नावामुळे अनेक प्रोजेक्ट हातातून गेल्याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

"आडनावामुळे रिजेक्ट केलं...", 'तारक मेहता...'च्या सोनालिका कांबळे जोशीने सांगितली मराठी इंडस्ट्रीची दुसरी बाजू
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय ठरलेली आणि प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत मिसेस माधवी भिडे ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेत्री सोनालिका कांबळे जोशी हिला प्रसिद्धी मिळाली. पण, अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी सोनालिकाला खूप स्ट्रगल करावा लागला आहे. सुरुवातीच्या काळात मराठी इंडस्ट्रीत सोनालिकाला वाईट वागणूक मिळाली. नावामुळे अनेक प्रोजेक्ट हातातून गेल्याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
सोनालिकाने नुकतीच जयंती वाघधरेच्या आम्ही असं ऐकलंय पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने मराठी इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "त्यावेळी नावाबद्दल थोडं असं होतं की अच्छा ही...कशाला? नको...आपल्या ग्रुपमध्ये ही बसत नाहीये. असंही माझ्यासोबत केलेलं आहे. म्हणजे तुम्ही माझं काम बघत नाही, कला बघत नाही. तुम्ही मागची बाजू बघताय ज्याचं लोकांना काहीच घेणं देणं नाही. जर मी आताच्या काळात आले असते तर कदाचित मराठी इंडस्ट्रीमध्ये मी अजून सक्रिय असते".
"त्या वेळेला आपण ज्या लोकांना सिनियर म्हणवतो, त्या लोकांची ही मेंटॅलिटी होती. ज्या लोकांना मी टीव्हीवर बघून हे लोक किती छान काम करत्यात असं मानलं त्यांची मेंटॅलिटी कळाली. कलेतली सिनिऑरिटी दाखवून काय उपयोग आहे? तुमची मेंटॅलिटी किती खालच्या दर्जाची आहे. कुठल्या गोष्टीचा बाऊ करून तुम्ही एखाद्या कलाकाराला खाली पाडताय. पण याचा मी कधीच विचार केला नाही. त्यामुळे माझ्यावर याचा काहीही परिणाम झालं नाही", असंही तिने सांगितलं.