Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: नट्टू काकांच्या भूमिकेला पूर्णविराम; मालिकेतून काढून टाकलं पात्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 13:24 IST2021-11-17T13:23:22+5:302021-11-17T13:24:00+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: या मालिकेत नट्टू काका ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक यांचं निधन झालं. त्यामुळे या मालिकेत आता नट्टू काकांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: नट्टू काकांच्या भूमिकेला पूर्णविराम; मालिकेतून काढून टाकलं पात्र?
गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं अवितरतपणे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah). आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्यच वाटतो. अलिकडेच या मालिकेत नट्टू काका (nattu kaka) ही भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक (ghanshyam nayak) यांचं निधन झालं. त्यामुळे या मालिकेत आता नट्टू काकांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, या प्रश्नावर आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी उत्तर दिलं आहे.
मध्यंतरी सोशल मीडियावर एका व्यक्तीचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यात फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती नट्टू काकांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता असित मोदी (asit modi) यांनी या भूमिकेविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या या निर्णयानुसार, आता मालिकेत नट्टू काका हे पात्र नसणार आहे.
"हे दु:ख पचवणंच खूप कठीण आहे. त्यांना जाऊन आता एक महिना झाला आहे. मी घनश्याम जींसोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांनी तारक मेहतासाठी जे योगदान दिलंय ते मी कधीच विसरु शकत नाही. त्यामुळे ही भूमिका अन्य कोणत्या व्यक्तीला साकारण्यासाठी द्यावी अशी सध्या तरी आमची कोणाचीच इच्छा नाही. पण, सध्या नव्या नट्टू काकांविषयी अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एकच विनंती आहे की अशा अफवांकडे लक्ष देऊ नका", असं असित मोदी म्हणाले.
दरम्यान, घनश्याम नायक यांचं ३ ऑक्टोबर रोजी निदन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना धक्का बसला होता. तारक मेहता का.. या मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घनश्याम नायक यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.