"शिक्षणाची कास साेडायची नाही", सुरुची अडारकरने सांगितलं तिच्या आयुष्यातील गुरुंचं महत्व
By अबोली कुलकर्णी | Updated: July 30, 2025 16:05 IST2025-07-30T16:02:26+5:302025-07-30T16:05:49+5:30
कोण आहेत सुरुची अडारकरचे गुरु? जाणून घ्या बातमीवर क्लिक करुन

"शिक्षणाची कास साेडायची नाही", सुरुची अडारकरने सांगितलं तिच्या आयुष्यातील गुरुंचं महत्व
म्हणतात ना, ‘गुरू माझं गणगोत...गुरू हीच माऊली...गुरू स्पर्श दूर करी...दु:खाची सावली’ ते अगदी खरंय. माझ्या आयुष्यात गुरूस्थानी कोण? याबद्दल एका कुणाचे नाव घेता येणार नाही. कारण, मी स्वामी समर्थांची पूजा करते, त्यांना गुरू मानते. पण, माझ्या आयुष्यात आई-बाबा हे सर्वार्थाने माझे गुरू आहेत, बाबा नागेश आडारकर (लॉचे प्रिन्सिपॉल) आणि आई शोभा आडारकर. मी आजही लहानसहान सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकते. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते.
आमच्या घरी अभिनय क्षेत्रात कुणी नाही. हे क्षेत्र माझ्यासाठी नवे आहे. त्यामुळे अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माझ्या आणि आई-बाबांच्या मनात धाकधुक होती. अभिनयाचं क्षेत्र एवढं मोठं आहे की, मी त्यात कशी काम करेल, कशा संधी मिळतील, हे क्षेत्र सुरक्षित आहे ना, असे अनेक प्रश्न आमच्या मनात होते. दहावीनंतर अभिनयाच्या क्षेत्रात रूची निर्माण झाली. मग मी माझ्या आईला सांगितलं की, मला या क्षेत्रात काम करायचंय. आईला काळजी होती. पण, वडिलांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी बेधडकपणे प्रसंगांना सामोरे जायला मला शिकवले. त्यावेळी मला बाबांनी एक गोष्ट सांगितली, कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सोडायचं नाही. शिक्षण तुम्हाला व्यापकदृष्टी देते, त्यामुळे तुमची प्रगती होते. मी एम.ए. केलं. आता मला पीएचडी पण करायची आहे.
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक काळ असतो की, त्यावेळी त्याला प्रचंड संघर्ष आणि मेहनत करावी लागते. जवळपास पंधरा वर्षापूर्वी मी ऑडिशन्स देत होते. तेव्हा मी खुप धडपड करायचे. खुप ऑडिशन्स दिल्या, नकार पचवले, मेहनत घेतली. एकदा मला हिंदी आणि मराठी या दोन्ही मालिकांच्या ऑफर्स सोबतच्या आल्या. हिंदी मालिकेच्या टीमला मी होकार दिला व मराठी मालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन मी माझा नकार कळवून आले.
मात्र, आठवडा झाला तरी हिंदी मालिकेच्या टीमकडून काहीच प्रतिसाद नाही. मग मी फोन केला असता कळाले की, ती मालिकाच होणार नाहीये. त्यानंतर मी मराठी मालिकेच्या टीमला फोन करून माझा होकार कळवला पण, तोपर्यंत त्यांचे मालिकेसाठीचे कास्टिंग पूर्ण झाले होते. त्यानंतर मग मी बोरिवली ते ठाणेपर्यंतच्या प्रवासात खुप रडले. घरी आले. आईला सांगितले, तेव्हा आई म्हणाली, तू रड. मोकळी हो. तुला कदाचित यातून बाहेर यायला वेळ लागेल. पण, डोळे पुसायचे आणि स्वत:साठी उठायचं. तिने मला त्यादिवशी खुप हिम्मत दिली. माझी आई प्रचंड स्ट्राँग आहे. ती माझी प्रेरणा आहे. मग मी निराश न होता भक्कमपणे उभी राहिले.