सूरज चव्हाणची लगीनघाई! एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि विवाह, लग्नपत्रिका पाहिलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:34 IST2025-11-18T13:34:39+5:302025-11-18T13:34:58+5:30
'गुलीगत किंग' सूरज चव्हाणची लग्नपत्रिका आली समोर, 'या' ठिकाणी पार पडेल ग्रँड लग्नसोहळा

सूरज चव्हाणची लगीनघाई! एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि विवाह, लग्नपत्रिका पाहिलीत का?
Suraj Chavan Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका 'रिल स्टार' आणि 'बिग बॉस मराठी ५' च्या विजेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा विजेता म्हणजे सगळ्यांचा लाडका सूरज चव्हाण. 'गुलीगत किंग' म्हणून घराघरात पोहोचलेल्या सूरजच्या आयुष्यात आता नवीन आणि खूप गोड पर्व सुरू होत आहे. सूरज चव्हाण लवकरच संजना हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याने नवीन घरात गृहप्रवेश केला आणि आता तो नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहत्यांमध्ये या 'गुलीगत किंग'च्या लग्नाची प्रचंड उत्सुकता असतानाच, त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सूरज चव्हाण आणि संजना यांच्यासाठी २९ नोव्हेंबर हा दिवस खूप खास असणार आहे. कारण, एकाच दिवशी त्यांचे सर्व महत्त्वाचे विधी पार पडणार आहेत. २९ नोव्हेंबरला सकाळी १२ वाजता साखरपुडा पार पडेल. त्यानंतर दुपारी २ वाजता हळदी समारंभ होईल. तर सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर सूरज आयुष्याची नवीन इनिंग सुरू करेल. हा विवाहसोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड येथे पार पडणार आहे.
shatriya_ramoshi' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही लग्नपत्रिका शेअर करण्यात आली आहे, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. सूरजची लग्नपत्रिका सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, सूरजचे हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्याची होणारी पत्नी संजना गोफणे ही सूरजच्या चुलतमामांची मुलगी आहे. सूरज हा 'गोफणे' परिवाराचा जावई होणार आहे.

आता सूरज आणि संजना यांना पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या बहुप्रतिक्षित लग्नाला 'बिग बॉस'मधील आणि मराठी कलाविश्वातील कोण-कोण उपस्थिती लावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.