'वरळीच्या घरी गेल्यावर ...'; अक्षयाने चाळीत साजरी केली दिवाळी, जुन्या आठवणींमुळे झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 17:42 IST2023-11-14T17:42:36+5:302023-11-14T17:42:58+5:30
Akshaya naik: अक्षयाने इन्स्टाग्रामवर तिच्या चाळीतल्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत.

'वरळीच्या घरी गेल्यावर ...'; अक्षयाने चाळीत साजरी केली दिवाळी, जुन्या आठवणींमुळे झाली भावुक
छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे 'सुंदरा मनामध्ये भरली'. जवळपास २ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. मालिकेत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीची भूमिका साकारणारी अक्षया खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. प्रसिद्धी मिळवल्यानंतरही अक्षया आजही अत्यंत साधेपणाने जीवन जगते. याचा प्रत्यय नुकताच प्रेक्षकांना आला.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने नुकतेच तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोमधून ती तिची दिवाळी मुंबईतील एका चाळीत सेलिब्रेट करताना दिसत आहे. इतकंच नाही तर चाळीतली दिवाळी कशी खास असते हे सुद्धा तिने सांगितलं आहे.
"चाळीतली दिवाळी यावर्षी दिवाळी जरा वेगळी वाटतेय. पुढच्या वर्षी अजून वेगळी असणार आहे हे माहित आहे म्हणून कदाचित. वरळीच्या घरी गेल्यावर माझं संपूर्ण बालपण आठवतं आणि आदर्श नगरमध्ये साजरा झालेला प्रत्येक सण. कितीही मोठे झालो, तरी चाळीत साजरे केलेले सण सगळ्यात खास राहतील", असं कॅप्शन देत अक्षयाने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखील बने याने सुद्धा त्याच्या चाळीतल्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला.