सुदेश बेरी ‘मुस्कान’ या मालिकेत साकारणार ही भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:15 IST2018-07-17T16:13:33+5:302018-07-17T16:15:17+5:30
अनेक चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेला सुदेश बेरी हा अभिनेता आता ‘स्टार भारत’वरील ‘मुस्कान’ मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुदेश बेरी ‘मुस्कान’ या मालिकेत साकारणार ही भूमिका
‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘मुस्कान’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत लवकरच एक नवी एंट्री होणार आहे. या एंट्रीनंतर मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.
अनेक चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारलेला सुदेश बेरी हा अभिनेता आता ‘स्टार भारत’वरील ‘मुस्कान’ मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत त्याला ‘सरजी’ असे संबोधले जाणार आहे. मुस्कानची आई आरती (अरिना डे) आणि अन्य महिला जिथे नृत्य करतात, त्या जागेचा तो मालक आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत असून आपल्या नकळत तिथे मुस्कान ही लहान मुलगी राहात असल्याचे त्याला कळताच तो संतापतो.
‘मुस्कान’मध्ये सरजी नेहमी पडद्यावर दिसेलच असे नाही; पण त्याची व्यक्तिरेखा ही मालिकेच्या कथानकात महत्त्वाची ठरते. जिथे मुस्कान आणि तिची आई आरती राहते, त्या जागेचा ‘सरजी’ मालक असल्याने मुस्कानचे भवितव्यही त्याच्या निर्णयावर ठरणार असते. तो नेहमी पांढऱ्या शुभ्र कपड्यांत दिसतो आणि त्याला राग आला, म्हणजे तो एक सिगार शिलगावतो. त्याची व्यक्तिरेखा ही दुहेरी हेतू आणि दुटप्पीपणाची असून ती खलनायकी प्रवृत्तीची आहे. या कार्यक्रमात काम करण्यास तो खूपच उत्सुक आहे. ‘मुस्कान’ या मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी सुदेश बेरी सांगतो, “योग्य परिणाम साध्य करण्यासाठी आपल्याला खलनायकाची गरज असते. मी यात ज्या ‘सरजी’ची भूमिका साकारीत आहे, तो धंदेवाईक प्रवृत्तीचा असून तो अधिकाधिक महिलांना नृत्य करण्यास प्रवृत्त करतो. पण अशा महिलांमधील कणखरपणा दाखविणे हा या मालिकेचा उद्देश आहे. अशा प्रेरणादायक मालिकेत मला भूमिका रंगविण्यास मिळत असल्यामुळे मला आनंद झाला आहे. माझी ‘सरजी’ची भूमिका प्रेक्षकांना पसंत पडेल, अशी आशा आहे.”
‘मुस्कान’ या मालिकेला आता काय काय वळणं मिळणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.