"एवढ्या वेळात दुबईला..." ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकला अभिनेता, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:03 IST2025-10-09T11:02:47+5:302025-10-09T11:03:06+5:30
ठाणे-घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबद्दल अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला...

"एवढ्या वेळात दुबईला..." ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकला अभिनेता, म्हणाला...
ठाण्यातील सर्वाधिक महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, रस्त्यावरील दैनंदिन प्रवाशांचे हाल भीषण झाले आहेत. सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सगळेच याबद्दल आपला संताप व्यक्त करत आहेत. आता यात मराठीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस राजेनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं रस्त्यांच्या या दुरवस्थेवरुन प्रशासनावर खोचक शब्दात टिका केली.
श्रेयस राजेनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने सरकारला टोलाही लगावला आहे. "ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही दिले.
अनेकदा ठाणे-घोडबंदर या रस्त्यावरुनच कलाकारांना त्यांचं शूटिंगचं ठिकाण गाठावं लागतं. वाहतुक कोंडी आणि घोडबंदर रोडच्या दुरवस्थेमुळे शूटिंगला पोहोचायला उशीर होतो. याबद्दल आतापर्यंत आस्ताद काळे,ऋतुजा बागवे, जुई गडकरी, सुरभी भावे, रुपाली भोसले, मिलिंद फाटक यांनीही याआधी नाराजी व्यक्त करत रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी कळकळीची विनंती केली आहे.
दरम्यान, श्रेयस राजे हा मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय चेहरा आहे. श्रेयस राजेने अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. श्रेयस राजे सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो अनेकदा सामाजिक विषयांवर आपलं मत परखडपणे मांडताना दिसतो. विशेष म्हणजे अलिकडेच तो मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला होता. त्याने इतर मराठी कलाकारांसोबत मिळून पूरग्रस्त भागातील गावांना सढळ हाताने मदतकार्याची मोहीम हाती घेतली आणि बीड जिल्ह्यातील काही गावांपर्यंत मदतही पोहोचवली.