झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:57 IST2025-07-11T11:56:54+5:302025-07-11T11:57:23+5:30
'तारिणी' मालिकेचा काल प्रोमो आला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज
झी मराठीवर नुकतंच नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. 'तारिणी' (Tarini) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवानी सोनार (Shivani Sonar) यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसंच अभिज्ञा भावेचीही भूमिका आहे. एन स्वराज मुख्य अभिनेता आहे. मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. दरम्यान कोणती मालिका निरोप घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
'तारिणी' मालिकेचा काल प्रोमो आला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शिवानी सोनारला अशा डॅशिंग अवतारात पाहून प्रेक्षक खूश झाले. एकंदर मालिकेचा संकल्पना सर्वांनाच आवडली. शिवानी 'तारिणी' ही स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'तारिणी' मालिकेचा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मालिका कधी सुरु होणार आणि याची वेळ काय असणार हे अजून समोर आलेले नाही. लवकरच... असं वाहिनीने स्पष्ट केलं आहे.
'तारिणी' मालिका येत असल्याने कोणती दुसरी मालिका निरोप घेणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 'कमाल प्रोमो आहे...लाखात एक आमचा दादा मालिका संपेल असं वाटतंय. शिवा मालिकेची वेळ बदलून तारिणी मालिका दाखवतीलट' असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. मालिकेच्या प्रोमो व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोनेंनी 'जबरा' अशी कमेंट केली आहे. तर रेश्मा शिंदेने 'कमाल' म्हणत कौतुक केलं आहे.