शिव ठाकरेने 'द फिफ्टी'चा विजेता ठरल्यानंतर दिली ग्रँड सक्सेस पार्टी; पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:05 IST2026-03-31T17:02:39+5:302026-03-31T17:05:12+5:30
शिवने मुंबईत भव्य 'सक्सेस पार्टी' दिली. ज्याचे खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शिव ठाकरेने 'द फिफ्टी'चा विजेता ठरल्यानंतर दिली ग्रँड सक्सेस पार्टी; पाहा व्हायरल व्हिडीओ
आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने आणि खेळाने प्रेक्षकांची मने जिंकणारा 'आपला माणूस' शिव ठाकरे यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'द फिफ्टी'च्या (The 50) पहिल्या सीझनचा तो विजेता ठरला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवने मुंबईत भव्य 'सक्सेस पार्टी' दिली. ज्याचे खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
'द फिफ्टी' हा शो ५० स्पर्धकांमधील चुरशीमुळे प्रचंड गाजला. पण, आपल्या जिद्दीने आणि खेळाडूवृत्तीने शिवने या सर्वांवर मात करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजयानंतर शिवने आयोजित केलेल्या पार्टीत त्याचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. शिवने इन्स्टाग्रामवर या पार्टीचा एक खास 'रॅप-अप' व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत नाचताना आणि केक कापताना दिसत आहे.
यशस्वी झाल्यानंतर शिवने आपल्या चाहत्यांचे आभार मानताना एक भावनिक पोस्ट लिहिली. "हा विजय जितका माझा आहे, तितकाच तो तुमचाही आहे. याचा एक भाग झाल्याबद्दल तुमचे आभार. जे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांची आम्हाला खूप आठवण आली. हे यश आपले आहे", अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.
'रोडीज'पासून सुरू झालेला शिवचा प्रवास 'मराठी बिग बॉस'चा विजेता आणि 'हिंदी बिग बॉस'चा रनरअप असा राहिला आहे. आता 'द फिफ्टी' जिंकून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, रिअॅलिटी शोच्या जगात त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. या विजयामुळे शिवच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.