"मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची, पण..." शिव ठाकरेचं रोखठोक मत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:53 IST2025-04-17T10:52:30+5:302025-04-17T10:53:11+5:30
शिव ठाकरेनं महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठी भाषेच्या वादावर स्पष्ट मत मांडलं.

"मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची, पण..." शिव ठाकरेचं रोखठोक मत, म्हणाला...
Shiv Thakare On Marathi Language Controvery: महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्यावरून नवा वाद पेटला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी न बोलल्यामुळे लोकांशी गैरवर्तन करण्यात आल्याच्या काही घटना समोर आल्यात. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रात राहात असल्यास मराठी आलीच पाहिजे असा आग्रह धरला आहे. तर काहींनी मारहाण करुन मराठी शिकवण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. आता या वादावर मराठमोळ्या शिव ठाकरेनं आपलं मतं माडलं आहे.
शिव ठाकरेनं नुकतंच वृत्तसंस्था आयएएनएसशी मराठी भाषा वादावर स्पष्ट मत मांडलं. "आपण कोणालाही कोणतीही भाषा बोलण्याची जबरदस्ती करु शकत नाही. मराठी बोलण्यास भाग पाडण्याची पद्धत चुकीची आहे. पण, हेतू योग्य असल्याचं शिव ठाकरे म्हणाला. मुंबईत राहणाऱ्या लोकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, यावर त्यानं भर दिला.
शिव पुढे म्हणाला, "तुम्ही जिथे राहता आणि कमावता त्या ठिकाणची भाषा शिकणे गरजेचे आहे. जर मी परदेशात गेलो तर मला गुगलच्या मदतीने स्थानिक भाषेत गोष्टींचे भाषांतर करावे लागतं. म्हणून, या गोष्टींबद्दल एक दृष्टिकोन असला पाहिजे".
इतर राज्यात गेल्यावर तिथली भाषा शिकण्याचा तो प्रयत्न करतो असं शिवनं सांगितलं. तो म्हणाला, "जर कोणी तुमची भाषा बोलत नसेल तर त्याला मारणे योग्य नाही. मला वाटतं जर मी गुजरात किंवा आसामसारख्या ठिकाणी गेलो, तर मी त्यांच्या स्थानिक भाषेतील काही शब्द शिकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून स्थानिक लोकांना बरे वाटेल. मी अलिकडेच बँकॉकला गेलो होतो, शूटिंगसाठी केपटाऊनलाही गेलो होतो. मी त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न केला होता".