शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर यांची नवी मालिका 'नवी जन्मेन मी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:31 PM2023-11-02T18:31:13+5:302023-11-02T18:33:31+5:30

गावात राहणा-या एका बिनधास्त, अल्लड, जगाच्या दबावाखाली न बदलता जगालाच बदलायला लावणा-या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

Shilpa Thackeray, Maniraj Pawar, Rohan Gujar's new marathi serial 'Navi Janmen Me' | शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर यांची नवी मालिका 'नवी जन्मेन मी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिल्पा ठाकरे, मणिराज पवार, रोहन गुजर यांची नवी मालिका 'नवी जन्मेन मी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कोण म्हणतं फक्त शहरातल्याच मुली धीट आणि बिनधास्त असतात, गावाकडच्या मुलींमध्ये सुध्दा जगाशी दोन हात करण्याची ताकद असते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्वानंदी’. ‘सन मराठी’वरील 'नवी जन्मेन मी'  या नव्या मालिकेत गावात राहणा-या एका बिनधास्त, अल्लड, जगाच्या दबावाखाली न बदलता जगालाच बदलायला लावणा-या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या जिद्दी, सर्वांच्या मनाचा अचूक ठाव घेणा-या भूमिकेचं नाव आहे स्वानंदी आणि ही प्रमुख भूमिका अभिनेत्री शिल्पा ठाकरे साकारणार आहे.  

स्वानंदी उर्फ शिल्पा ठाकरेचा या मालिकेत गाव ते शहर असा प्रवास दाखवण्यात येणार आहे. करियरच्या निमित्ताने गावाकडून शहरात आलेल्या स्वानंदीला नवीन जागेसोबत, शहरी वातावरणात कसं जुळवून घ्यावं लागणार आहे, त्यामध्ये आलेल्या चॅलेंजेसला कसं सामोरं जावं लागणार आहे, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्वानंदीचा स्वत:वर असा विश्वास आहे की, ती जगाला बदलू शकते, पण तिच्या याच स्वभावामुळे तिला काय काय अनुभवावं लागेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

तसेच या मालिकेत मणीराज पवार, रोहन गुजर आणि साक्षी गांधी या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. मणीराज पवार यामध्ये ‘मणी’ ची भूमिका साकारतोय जो अतिशय शांत, समजूतदार, कामसू, दुसऱ्यांना मदत करणारा आणि उपकारांची जाणीव असणारा मुलगा आहे. या मालिकेतील ‘सुजित’ या भूमिकेत अभिनेता रोहन गुजर दिसणार आहे. रोहनची भूमिका ही खुषालचेंडू. श्रीमंतीचा माज नसला तरी त्याचा पूर्ण उपभोग घेणारा, शातिर, बाबांच्या धाकात असणारा आणि आईला गुंडाळण्यात एक्सपर्ट, मुलींसाठी चार्मिंग बॉय असा हा सुजित. मालिकेचे दोन नायक भिन्न स्वभावाचे, ते समोरासमोर आले तर काय होईल हे पाहणं रंजक असणार आहे. या मालिकेतील आणखी एक अनोखं  पात्रं म्हणजे ‘संचिता’. अभिनेत्री साक्षी गांधी साकारत असणारी ‘संचिता’ ही भूमिका महत्त्वाकांक्षी, चलाख आणि कुणाशी कसं वागावं याची जाणीव असणारी. या चारही भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहेत. 'नवी जन्मेन मी' ही नवी मालिका नक्की पाहा येत्या ६ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: Shilpa Thackeray, Maniraj Pawar, Rohan Gujar's new marathi serial 'Navi Janmen Me'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.