५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:14 IST2026-01-05T18:13:26+5:302026-01-05T18:14:01+5:30
शशांकने याबाबत पोस्टमधून मन हे बावरे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शशांकचे तब्बल ५ लाख रुपये येणं बाकी असून निर्मात्याकडे सतत ५ वर्ष मागणी करूनही ते परत मिळालेले नाहीत.

५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
शशांक केतकर हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. 'होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला', 'मुरांबा' अशा मालिकांमध्ये काम करून शशांकने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या सगळ्याच मालिका लोकप्रिय ठरल्या. शशांक सोशल मीडियावर सक्रिय असून त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स चाहत्यांना देत असतो. मराठीतील एका निर्मात्याने शशांकचे पैसे थकवले आहेत. शशांकने याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरीही शेअर केली होती. आज शशांकने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि निर्मात्याच्या मेसेजचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत. शशांकचे तब्बल ५ लाख रुपये येणं बाकी असून निर्मात्याकडे सतत ५ वर्ष मागणी करूनही ते परत मिळालेले नाहीत.
शशांकने याबाबत पोस्टमधून मन हे बावरे मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोस्टमध्ये शशांक म्हणतो, "नमस्कार...मी कायदेशीर कारवाई करतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा यासाठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉटसहित पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गयावया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो".
पुढे शशांकने म्हटलंय की, "५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालिकेचे पर डेप्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले ( मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्याने पेमेंट देताना TDS कापला आणि सरकारला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे. बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे".
"युट्यूबवर ४ वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न क्लिअर दिसतो. आणि आमच्या पैशाचं केलं काय याबद्दल चकार शब्द काढत नाही तो... असो, या पुढचा व्हिडीओ बाकी सगळ्या legal details सकट असेल. याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा टीममधला कोणीही जबाबदार नसेल. इथे हे आवर्जून सांगावं लागेल सगळेच निर्माते असे फ्रॉड अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी याच्याबद्दल आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत. त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतोय ते. आम्ही उत्तम काम करून तुमच प्रोजेक्ट चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमच काम उत्तम करा!", असंही शशांकने म्हटलं आहे.