दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 12:54 IST2025-05-05T12:54:06+5:302025-05-05T12:54:22+5:30
आईपण असंही असतं... ममता ही केवळ जन्म देण्यात नाही, तर कर्मातही असते, शर्मिष्ठा राऊतचं उदाहरण!

दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती तिच्या फोटोंसोबतच आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. शर्मिष्ठाने अलीकडेच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. पण, तुम्हाला माहितये एका मुलीची आई होण्याआधीच शर्मिष्ठा ही दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया करत आली आहे.
शर्मिष्ठा लेकीचं काही दिवसांपुर्वीच कलाकारांच्या उपस्थित बारस झालं. अभिनेत्रीनं मुलीचं नाव 'रुंजी' असं ठेवलं आहे. 'रुंजी' शिवाय अभिनेत्री आणखी दोन मुलांची आई आहे. शर्मिष्ठानं दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललेली आहे. तसेच तिनं 'चिकू' नावाच्या पाळीव प्राण्याचा बाळाप्रमाणे सांभाळ केलाय. आई झाल्यानंतर शर्मिष्ठा राऊतनं नुकतंच 'हंच मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत पालकत्वावर विचार मांडले. तिनं सांगितलं की, "रुंजी आता आली असली तरी मी याआधीसुद्धा आईपण अनुभवलं आहे. शर्मिष्ठाला 'चिकू' नावाच्या पाळीव प्राण्याचा सांभाळ करताना आई झाल्याचा अनुभव मिळाल्याचं तिनं नमूद केलं.
याच मुलाखतीत शर्मिष्ठाने मनीषा आणि आशीष या दोन मुलांचं शिक्षण खांद्यावर घेतल्याची माहिती दिली. मनीषाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्या शिक्षणाची जबाबदारी शर्मिष्ठाने उचलली. तर आशीष हा पूर्णपणे अनाथ असून, त्याचं पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण तिनं पुरवलं. आशीषचं शालेय शिक्षण आता पूर्ण झालं आहे.
आई झाल्यावर शर्मिष्ठा म्हणाली, "तुमच्या म्हातारपणाची काठी होईल म्हणून मुलांना जन्म देणं चुकीचं आहे. तुम्हाला जर खरोखर कुटुंब हवं आहे, तरच मुलं जन्माला घाला. स्वार्थासाठी मुलांना अडकवू नका. उद्या त्यांनी परदेशात जायचं ठरवलं, तर 'आम्ही एकटे राहू' म्हणून त्यांना थांबवू नका", असंही तिनं स्पष्ट केलं. शर्मिष्ठा राऊतच्या मते, "कोणताही स्वार्थ न ठेवता, फक्त कुटुंब हवं आहे, आई-बाबा होण्याचा अनुभव घ्यायचा आहे. या नितळ कारणासाठीच पालक व्हावं". शर्मिष्ठाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशीम गाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये काम केलं आहे.