"तिने त्या काळात फार...", प्रिया मराठेच्या आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलला शंतनु मोघे, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:25 IST2026-04-03T16:20:22+5:302026-04-03T16:25:28+5:30
प्रियाच्या कॅन्सरच्या लढाईत तिचा पती आणि अभिनेता शंतनु मोघे तिच्यासोबत खंबीर उभा होता. प्रियाच्या निधनानंतर शंतनु पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.

"तिने त्या काळात फार...", प्रिया मराठेच्या आजारपणाबद्दल पहिल्यांदाच बोलला शंतनु मोघे, म्हणाला...
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री प्रिया मराठेने गेल्या वर्षी अकाली एक्झिट घेतली. काही वर्षांपासून ती कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत होती. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी प्रियाचं कॅन्सरने निधन झालं. तिच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत होती. प्रियाच्या कॅन्सरच्या लढाईत तिचा पती आणि अभिनेता शंतनु मोघे तिच्यासोबत खंबीर उभा होता. प्रियाच्या निधनानंतर शंतनु पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.
शंतनुने पत्नी प्रियाच्या निधनानंतर काही दिवसांतच मालिकेच्या शूटला सुरुवात केली होती. येड लागलं प्रेमाचं मालिकेत तो दिसला होता. आता कलर्स मराठीवर नव्याने सुरू झालेल्या 'मोहिनी' मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नुकतंच त्यांने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने प्रियाच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं. शंतनु म्हणाला, "आयुष्य पुढे जात राहतं. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. खरंतर तिनं त्या काळात फार धैर्याने सामना केला. पण, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आजारपणाच्या त्या लढाईत आम्ही हरलो".
"प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्याची जडणघडण वेगळ्याप्रकारे होत असते. शेवटी आपलं आपल्याकडे...एवढंच मी म्हणेन. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ते प्रियाला खूप आवडलं होतं. सुरुवातीला आम्ही दोघांनी 'या सुखांनो या' मालिकेत एकत्र काम केलं होतं. पण त्यात आमचे सीन्स कधी एकत्र नव्हते. तिला मी केलेलं एक सफरचंद नावाचं नाटकही खूप आवडलं होतं", असंही शंतनु पुढे म्हणाला.
प्रिया मराठेनं नाटक, मालिका, चित्रपट सर्व माध्यमांवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सकारात्मक, ऐतिहासिक, नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारल्या आहेत. आतापर्यंत तिने अनेक लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. 'या सुखांनो या', 'चार दिवस सासूचे', 'पवित्र रिश्ता' आणि 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या मालिकांमधून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मालिकांसोबतच तिनं 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.