"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:50 IST2025-10-03T10:49:13+5:302025-10-03T10:50:24+5:30
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता प्रभुणे यांनी सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
सुशांत सिंह राजपूतला जाऊन आज इतकी वर्ष झाली तरी अजूनही चाहते त्याला मिस करतात. 'पवित्रा रिश्ता' मालिकेमुळे सुशांत प्रसिद्धीझोतात आला होता. याच मालिकेत सुशांतसोबत प्रिया मराठे, अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहेरे, उषा नाडकर्णी, सविता प्रभुणे असे मराठी कलाकारही होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता प्रभुणे यांनी सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
सविता प्रभुणे यांनी अमोल परचुरे यांच्या कॅच अप' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्यांनी सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की या काहीच बोलल्या नाहीत. यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. माझं सोशल मीडिया तुम्ही पाहिलं असेल तर मी कुठल्याही बाबतीत व्यक्त होत नाही. व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. जवळच्या लोकांना सगळ्यांना माहितीये की, मला याबद्दल किती वाईट वाटलं. किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते."
"सुशांतबद्दल सांगायचं तर, आम्ही तीन वर्ष सलग एकमेकांसोबत काम केलं होतं. आम्ही दिवसरात्र एकमेकांसोबत काम करत होतो. तो इतका गोड मुलगा होता, कामाच्या बाबतीत इतका शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणारा होता. फोकस होता. त्यामुळे हा मुलगा पुढे चढतच जाणार हे माहित होतं. तसंच झालं, ३ वर्षांनंतर तो फिल्ममध्ये गेला. तो फिल्ममध्ये गेल्यावर आमचा संपर्क खूप कमी झाला. पण सुशांतबद्दल नेहमी कौतुक होतं की हा छान करतोय", असंही त्यांनी सांगितलं.