भैरवीच्या खोटारडेपणाचा बुरखा फाटणार! सावलीच्या आवाजाचं सत्य समोर येणार, प्रोमो पाहून चाहते म्हणाले- "अंगावर काटा आला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:16 IST2025-12-31T16:15:24+5:302025-12-31T16:16:26+5:30
सावलीच्या परिस्थितीचा भैरवी चुकीचा वापर करून घेते. सावलीच्या आवाजात गाणं गाऊन ती तिची मुलगी ताराचा आवाज आहे असं सांगत प्रसिद्धी मिळवते. पण, आता भैरवीचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड होणार आहे.

भैरवीच्या खोटारडेपणाचा बुरखा फाटणार! सावलीच्या आवाजाचं सत्य समोर येणार, प्रोमो पाहून चाहते म्हणाले- "अंगावर काटा आला..."
'सावळ्याची जणू सावली' ही झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील सावली आणि सारंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. गोड गळ्याची आणि साध्या भोळ्या स्वभावाची सावली प्रेक्षकांना भावली. पण, सावलीच्या परिस्थितीचा भैरवी चुकीचा वापर करून घेते. सावलीच्या आवाजात गाणं गाऊन ती तिची मुलगी ताराचा आवाज आहे असं सांगत प्रसिद्धी मिळवते. पण, आता भैरवीचा खोटारडेपणा सर्वांसमोर उघड होणार आहे.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सारंग सावलीच्या आवाजाचं सत्य समोर आणणार आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की स्टेजवर तारा गात असल्याचं सगळ्यांना वाटत आहे. मात्र नंतर स्टेजवरचा दरवाजा उघडतो आणि त्यामागे सावली गात असल्याचं सगळ्यांना दिसतं. त्यानंतर सारंग सगळ्यांसमोर सावलीला घेऊन येतं. ताराच्या आवाजामागचं सावलीचं सत्य समोर येताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. सावली भैरवीला हातातील धागा काढून देत तिच्या बंधनातून मुक्त होते.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहते खूश झाले आहेत. या प्रोमोवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "प्रोमो पाहून मन आनंदित झालं", "सत्य एकदाचं समोर आलं", "अंगावर काटा आला", "हाच तो क्षण हिच ती वेळ", अशा कमेंट या प्रोमोवर केल्या आहेत. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.