"हिला मालिकेत का घेतलंय? ", सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:00 IST2025-04-27T15:57:51+5:302025-04-27T16:00:28+5:30
'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीला दिसण्यावरुन कराला लागला ट्रोलिंगचा सामना, म्हणाली...

"हिला मालिकेत का घेतलंय? ", सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Snehalata Maghade : छोट्या पडद्यावरील टीव्ही मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत. या मालिका जितक्या नायिकेच्या खांद्यावर असतात तितकंच खलनायिकासुद्धा मालिकेला उचलून धरते. यातील एक अभिनेत्री म्हणजेच स्नेहलता माघाडे. 'ठिपक्यांची रांगोळी', 'मन धागा धागा' जोडते नवा यांसारख्या मालिकांमधून अभिनेत्री स्नेहलता माघाडे घराघरात पोहोचली. सध्या ती 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत काम करताना दिसते आहे. दरम्यान, खलनायिका म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या या अभिनेत्रीला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अलिकडेच अभिनेत्रीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
नुकताच अभिनेत्री स्नेहलता माघाडेने 'स्टार मीडिया मराठी 'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेत्री म्हणाली, "मी खूप आवर्जून कमेंट्स वाचत असते. मला माझ्या पात्रावरुन ट्रोल केलंच जात, पण वैयक्तिकरित्या सुद्धा देखील लूकवरुन खूप बोललं जातं. म्हणजे या गोष्टी माझ्यासाठी काहीच नाहीत. कारण, समोरच्याला माहित नसतं की आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत. आपण कसे जगत आहोत. मी किती मेहनत करते. सगळे कलाकार किती मेहनत करतात. त्याचा मी जास्त विचार करत नाही. खूप ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न करतात की आंटीसारखी दिसते, हिरोला शोभत नाही. अशा कमेंट्स मला आल्या. शिवाय हिला मालिकेत का घेतलंय? अजून सुंदर मुलगी घ्यायला हवी होती,अशा खूप गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन काम करावं लागतं."
त्यानंतर अभिनेत्रीने सांगितलं, "प्राप्तीला देखील या गोष्टी लागू होतात. खरंतर हा शो देखील यावरच आधारित आहे. काळ्या रंगामुळे तुम्हाला ऐकावं लागतं आणि त्याविरोधात तुमचा वैचारिक लढा असतो. हा इतरा मोठा संदेश आपण खऱ्या आयुष्यात लागू केला नाही तर काही अर्थच नाही. त्यामुळे मी कायम सकारात्मक राहण्याचा विचार करते." असा खुलासा करत अभिनेत्रीने मनातील खंत व्यक्त केली.