"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही..." अमेरिकेत मराठी गृहस्थांना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:17 IST2025-06-18T17:16:13+5:302025-06-18T17:17:17+5:30

संकर्षणनं अमेरिकेत जवळपास ४५ वर्षे राहणारे प्रसिद्ध व्यावसायिकाची भेट घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Sankarshan Karhade Shares Heartwarming Post For Sudarshan Sathe America | "सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही..." अमेरिकेत मराठी गृहस्थांना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, लिहिली खास पोस्ट

"सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही..." अमेरिकेत मराठी गृहस्थांना भेटून संकर्षण कऱ्हाडे भारावला, लिहिली खास पोस्ट

मराठी अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. संकर्षण सध्या नाटक , टीव्ही आणि सिनेमा अशा तिनही माध्यमांत मुशाफिरी करत आहे.  संकर्षण विविध माध्यमांत कार्यरत असला तरीही त्याने रंगभूमीची कास सोडली नाही. त्याचे नाटकचे प्रयोग सुरू असतात.  सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायम चाहत्यांसोबत आपले नाटक दौऱ्यादरम्यान आलेले अनुभव शेअर करत असतो. अशातच संकर्षणनं अमेरिकेत जवळपास ४५ वर्षे राहणारे प्रसिद्ध व्यावसायिकाची भेट घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. 

अमेरिकेत जवळपास ४५ वर्षे राहणारे प्रसिद्ध व्यावसायिक सुदर्शन साठे यांना भेटल्यानंतर संकर्षण प्रचंड भारवला. त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर करत त्यानं भावना व्यक्त केल्या आहेत.  सुदर्शन साठे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यानं लिहलं, "मराठी आणि  महाराष्ट्र मनात घेऊन अमेरिकेत फिरणारं "सुदर्शन चक्र...". नाटकाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर वेगवेगळी माणसं भेटतात. या अमेरिका दौऱ्यात क्लिव्हलंड शहरांत "सुदर्शन साठे..." भेटले…! काय, किती आणि कसं बोलायचं ह्यांच्याविषयी… ??? आधी भौतिक श्रीमंती सांगतो… म्हणजे तुमचा वाचण्यातला इंटरेस्ट वाढेल. फूटबाॅल ग्राऊंडपेक्षा २ पावलं कमी भरेल एवढं मोठं ह्यांचं घर. घराच्या दाराशी ठेवलेल्या "रागावलेल्या सिंव्हाच्या पुतळ्यापासून ते घराच्या मागे टेनिस कोर्टच्या शेजारी ठेवलेल्या "8 Hours chair", म्हणजे ८ तास बसलं तरी बूडाला आणि बूडाच्या मालकाला कंटाळा येणार नाही. अशा खुर्चीपर्यंत सगळं अत्यंत विचारपूर्वक आणि मौल्यवान.

"ज्या ज्या महागड्या गाड्या पाहून माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या भूवया ऊंचावतील, त्या त्या सगळ्या गाड्या घरात.  बाहेर पडायचं निमित्त काय आहे…? त्या नूसार गाडी बदलायची अन् काढायची. २ BHK फ्लॅटच्या २ बेडरूम मिळून जेवढी जागा असेल तेवढं ह्यांचं कपड्यांचं कपाट, बूट, चष्मा वगैरे ह्यांची व्हरायटी नकोच बोलायला. ऊंची जवळपास ६ फुट…  DON मधल्या बच्चन साहेबांच्या रूबाबाला टक्कर देणारी ह्यांची चाल अन् स्टाईल", असं म्हटलं.

पुढे त्यानं लिहलं, "आता खरी श्रीमंती… श्रीमंती क्रमांक २ सांगतो… नीट वाचा… समर्थ रामदासांचा दासबोध, भगवत् गीता, रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या, संत तुकारामांचे अभंग या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास, पाठांतरासहीत.छ. शिवाजी महाराजांच्याविषयी खूप आदर, अभ्यास... महाराष्ट्रात राहुन आपण तरी काय शुद्ध बोलतो अशी स्वच्छं मराठी… भारत देशाबद्दल प्रचंड अभिमान… देशांतर्गत मुद्दे, महाराष्ट्र, राजकारण, खेळ, कला याविषयीची ऐकीव नाही तर अभ्यासलेली माहिती, प्रचंड वाचनातून आलेलं ज्ञान. वागायला अत्यंत नम्रं. प्रत्येकाचं म्हणनं शांतपणे ऐकायची तयारी… ४५ वर्षं अमेरिकेत खूप कष्टं करून कमावलेली माणसांची, विचारांची, ज्ञानाची श्रीमंती… त्यांनी विचार करून प्रत्येक शब्दाचा मान राखून बोललेल्या प्रत्येक वाक्यांत आयुष्याचं सार सापडावं असे मुद्दे.  मी विस्मयचकीत झालो, भारावलो, सुखावलो आणि काय काय झालो".

संकर्षण लिहतो, "त्यांना त्यांचे आई-वडील, आई-वडिलांनी दिलेली शिकवण आणि केलेल्या संस्कारांची स्वत:च्या वयाच्या सत्तरीनंतरही ताजी आठवण आणि जाण… बायकोविषयी प्रचंड आदर आणि प्रेम… जगातल्या सगळ्याच नवऱ्यांना पटत नाही तसा त्यांना जरी त्यांच्या बायकोचा मुद्दा नाही पटला तरी,सांगायची पद्धत सुद्धा फार आदर देणारी आणि कितीही व्यग्रता असली तरी रोsssज त्यांच्या ठरलेल्या "गजानन महाराजांच्या पोथीतला" एक अध्याय वाचण्यावरची त्यांची श्रद्धा… देवावरचा प्रचंड, दृढ विश्वास… श्रीराम, श्रीकृष्ण यांना "आलो तुमच्या पायाशी" म्हणून लीन झालेलं त्यांचं अंतःकरण… कुणालाही कुठल्याही तराजूमध्ये न तोलणारी, सगळ्यांशी एकसारखी वागायची त्यांची पद्धत… समोरच्याला सतत आनंद देण्याचा, त्यांच्या ज्ञानात, माहितीमध्ये भर घालणारा त्यांचा दानशूरपणा आणि हे सगळं त्यांच्याकडे असतानाही मी त्यांच्यासमोर पहिल्यांदा आलो, तेव्हा माझा हात हातात घेऊन मला म्हणाले "सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या माणसाचा स्पर्श झाला… आता मलाही आशीर्वाद मिळेल…" हे ऐकल्यावर मला भारी वाटलं होतं. पण, जसा जसा या माणसाचा सहवास लाभला. त्यानंतर मात्र माझ्यासाठी वापरलेल्या त्या वाक्यावरून त्यांची विनोद बुद्धीही कमाल असल्याची मला खात्री पटली".

"३ दिवसांत मी या माणसासमोर भक्त होऊन बसलो. त्यांना ऐकलं… सतत असं काहीतरी सांगायचे की, मोत्यांचा पाऊस पडला तर कोणता मोती वेचावा या गोंधळातच वेळ जावा तसं माझं झालं… तिसऱ्या दिवशी मी कागद पेन घेऊन बसलो आणि चक्क ते बोलतात ते लिहित गेलो… निघतांना त्यांना म्हणालो, 'सुदर्शन सर मला तुम्ही खूप आवडलात… मला आशीर्वाद द्या…' त्यांनी समर्थ रामदासांचा दासबोध दिला. त्यांचा निरोप घेताना का कोण जाणे मला खूप रडू येत होतं… मी निघतांना त्यांना घट्ट मिठी मारली. मला त्यांना अजिबात सोडवत नव्हतं… त्यांनी पाठीवरुन त्यांचा हात छान फिरवून गाडीत बसण्यापूर्वी एक हात वर करुन एकदम स्टायलिश बाय केलं आणि त्यांच्या शर्टच्या पांढऱ्या रंगाला मॅच होणाऱ्या पांढऱ्याशुभ्र महागड्या गाडीत निघून गेले… आपण नुसते मराठी, महाराष्ट्र, धर्म असा गवगवा करतो. पण, सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही मनात, वागण्यात, कर्तृत्वात, मराठी भाषा, महाराष्ट्र आणि भारत घेऊन फिरणारं "सुदर्शन चक्र" मला अनेक अर्थांनी चक्रऊन गेलं... धन्यवाद", या शब्दात संकर्षण याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 

Web Title: Sankarshan Karhade Shares Heartwarming Post For Sudarshan Sathe America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.