"आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं" संजू राठोडनं शेअर केला 'हिटमॅन' रोहित शर्मासोबतचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 17:34 IST2026-03-22T16:11:13+5:302026-03-22T17:34:01+5:30
संजून त्यांची 'फॅन मुव्हमेंट' शेअर केली आहे.

"आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं" संजू राठोडनं शेअर केला 'हिटमॅन' रोहित शर्मासोबतचा व्हिडीओ
संजू राठोड हा मराठी चेहरा सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथील धनवड (Dhanwad) गावातून आलेल्या संजूला आज देशभरात अनेक जण त्याच्या गाण्यांसाठी ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात. संजू राठोडने मेहनतीने हे सगळं कमावलं असून आज त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पण, संजू हा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा चाहता आहे. नुकतंच संजून त्यांची 'फॅन मुव्हमेंट' (Fan Movement) शेअर केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या एका विशेष कार्यक्रमात संजूने रोहित शर्माची भेट घेतली. संजू राठोडने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर रोहित शर्मासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा संजूला प्रेमाने मिठी मारताना आणि त्याच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. संजूने रोहितकडे ऑटोग्राफची विनंती केली, ज्यावर रोहितने संजूच्या टी-शर्टवर स्वाक्षरी दिली. हा आनंद व्यक्त करताना संजूने कॅप्शनमध्ये लिहिले, "आज लहानपणीचं एक स्वप्न पूर्ण झालं, धन्यवाद रोहित शर्मा, राजा माणूस!". संजूचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघाच्या या कार्यक्रमामध्ये संजूनं रोहितबरोबरच हार्दिक पंड्याचीही भेट घेतली. हार्दिक व संजूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, संजू राठोडने आपल्या कलेने मराठी संगीताला एक नवी ओळख दिली आहे. संजूच्या घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. पण, मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं. संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये. त्याच्याकडे सेकंड-हँड लॅपटॉप आणि इअरफोन्स होते. यावर त्याने गाणी बनवायला सुरुवात केली, सतत काम करत राहिला आणि अखेरीस संयमी आणि लाजाळू असलेल्या संजूच्या पदरी यश पडलं.