घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला संग्राम समेळ, मनोरंजनविश्वातील वाढत्या प्रमाणावरही केलं भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:23 IST2025-11-20T17:22:18+5:302025-11-20T17:23:10+5:30
संग्राम समेळने २०२१ साली दुसरं लग्न केलं. याआधी त्याचा अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत घटस्फोट झाला होता.

घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला संग्राम समेळ, मनोरंजनविश्वातील वाढत्या प्रमाणावरही केलं भाष्य
मराठी अभिनेतासंग्राम समेळ सध्या चर्चेत आहे. 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची' नाटकात तो दिसत आहे. संग्रामने याआधी 'मुलगी पसंत आहे','सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'विकी वेलिंगकर', 'स्वीटी सातारकर' सिनेमात तो दिसला आहे. संग्रामने २०२१ साली श्रद्धा फाटकसोबत दुसरं लग्न केलं. त्याआधी त्याने अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत घटस्फोट घेतला होता. आता 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची' नाटकानिमित्त त्याने घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
'कलाकट्टा'ला दिलेल्या मुलाखतीत संग्राम समेळ म्हणाला, " प्रत्येकाने स्वत:साठी जगणं थोडंसं कमी करुन दुसऱ्यासाठी जगायचं ठरवलं तर या गोष्टींचं प्रमाण आपोआप कमी होईल. मी, माझं, माझी वेळ किंवा माझी स्पेस या गोष्टी असतील त्यांनी लग्नच करु नये. कारण लग्न म्हणजे दुसऱ्यासाठी जगणं आलं. स्वत:च्या गोष्टींचा त्याग करणं आलं. हीच गोष्ट नाटकात पाहायला मिळेल."
मनोरंजनविश्वातील घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर संग्राम म्हणाला, "मला वाटतं हे प्रमाण सगळीकडेच आहे. पण मनोरंजनविश्वाचं जास्त चर्चेत येतं. कारण आपलं माध्यमांमध्ये दिसतं. आपल्याकडे झालं की ते लगेच मीडियावर दाखवलं जातं. नाहीतर कॉर्पोरेटमध्ये तर यापेक्षा जास्त प्रमाण आहे. एका सर्वेक्षणात कॉर्पोरेटमधील घटस्फोटाचं सर्वात जास्त प्रमाण असल्याचं समोर आलं होतं. पण ते कधी लोकांसमोर येत नाही. हे माझ्या घरात नको समोरच्या घरात होऊ दे अशी अनेकांनी मानसिकता असते. हीच नाटकाची गंमत आहे."
'गोष्ट तिच्या घटस्फोटाची' नाटकात संग्राम समेळसह राजन ताम्हणे, राजन ताम्हणे, अदिती देशपांडे यांची मुख्य भूमिका आहे. एका स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक, तितक्याच वास्तववादी प्रवासाची मांडणी करणारे हे नाटक आहे. नात्यांमधल्या तुटणा-या क्षणांना, मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या वेदनांना आणि नव्या सुरुवातीच्या आशेला स्पर्श करणारी ही कथा आहे.