‘साता जल्माच्या गाठी…’ नवी मालिका रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 11:55 IST2019-09-16T11:53:37+5:302019-09-16T11:55:30+5:30

‘साता जल्माच्या गाठी’ नावाप्रमाणेच मातीत रुळलेली लव्हस्टोरी आहे. मुख्य म्हणजे साताऱ्यात घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे साताऱ्यातच मालिका शूट होतेय.

Saata Jalmachya Gathi New Tv Series | ‘साता जल्माच्या गाठी…’ नवी मालिका रसिकांच्या भेटीला

‘साता जल्माच्या गाठी…’ नवी मालिका रसिकांच्या भेटीला

प्रेम ही अडीच अक्षरं नुसती कानावर जरी पडली तरी अनेकांच्या अंतकरणातील तारा छेडल्या जातात. प्रत्येकाच्या मनात ‘त्या’ खास व्यक्तीबद्दलचा हळवा कोपरा हा असतोच. प्रेमात पडणं जरी सोपं असलं तरी ते निभावणं मात्र कठीण. प्रेमासाठी कायपण करण्याची तयारी असणारे प्रेमवीर अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतकेच. युवराज त्यापैकीच एक. श्रुतीवर जीवापाड प्रेम करणारा आणि प्रेमासाठी कायपण करायला तयार असणारा. श्रुती आणि युवराजची ही अनोखी लव्हस्टोरी ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतून पाहायला मिळेल. प्रेमाच्या आणाभाका देत सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या दोघांच्याही प्रेमाची गोष्ट वाटते तितकी सोपी नाही बरं का. यांनाही बरीच अग्निदिव्य पार करावी लागणार आहेत. म्हणूनच युवराज श्रुतीची ही प्रेमकहाणी थोडी हटके आहे. सध्या टीव्हीवर सुरू असणारे प्रोमोने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.


‘साता जल्माच्या गाठी’ नावाप्रमाणेच मातीत रुळलेली लव्हस्टोरी आहे. मुख्य म्हणजे साताऱ्यात घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे साताऱ्यातच मालिका शूट होतेय. मालिकेतले बरेचसे कलाकार साताऱ्यातले आहेत त्यामुळे एक वेगळी भट्टी जमून आलीय. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळी गोष्ट  पाहायला मिळेल.’

श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. श्वेता मुळची साताऱ्याची असल्यामुळे तिचं साताऱ्यावर विशेष प्रेम आहे. मालिकेसाठी कलाकार आणि ठिकाणाची जुळवाजुळव सुरु असताना सातारा आणि आसपासच्या परिसरातील कलाकारांच्या निवडीवर भर देण्यात आला. मालिकेत दिसणारा दिमाखदार बंगलाही साताऱ्याचाच आहे. स्टार प्रवाहसोबत श्वेताचे जुने बंध आहेत. लक्ष्य मालिकेतल्या भूमिकेसाठी श्वेताचं विशेष कौतुक झालं होतं. ‘साता जल्माच्या गाठी’च्या निमित्ताने ती निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर ही जोडी टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. सातारी भाषेचा लहेजा जपत या दोघांनीही मालिकेची गोडी वाढवलीय. तेव्हा युवराज आणि श्रुतीची ही अनोखी प्रेमकहाणी रसिकांचे मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
 

Web Title: Saata Jalmachya Gathi New Tv Series