हिप हिप हुर्रे फेम रुषद राणा या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:30 IST2018-11-04T06:30:00+5:302018-11-04T06:30:00+5:30

रुषदने हिप हिप हुर्रे या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये तसेच मोहोब्बते सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण आजही त्याची ओळख ही राघव म्हणूनच आहे.

Rushad Rana entry in Kullfi Kumarr Bajewala | हिप हिप हुर्रे फेम रुषद राणा या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

हिप हिप हुर्रे फेम रुषद राणा या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

‘हिप हिप हुर्रे’ या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत राघवच्या भूमिकेत आपल्याला रुषद राणाला पाहायला मिळाले होते. रुषदने हिप हिप हुर्रे या मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये तसेच मोहोब्बते सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण आजही त्याची ओळख ही राघव म्हणूनच आहे. प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता आता प्रेक्षकांना लवकरच ‘स्टार प्लस’ वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत दिसणार आहे.

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत रुषद बॅड बॉयच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय. रुषदने आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका रंगविल्या होत्या. पण आता ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो या मालिकेत नकारात्मक वृत्तीच्या संगीतकाराची भूमिका रंगवणार आहे. तो श्रीमंत असून अरेरावी वृत्तीचा संगीतकार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. त्याला कोणाची तरी कारकीर्द संपुष्टात आणायची आहे आणि त्यासाठीच तो आलेला आहे. आता त्याला कोणाची कारकीर्द संपुष्टात आणायची हे तुम्हाला मालिका पाहिल्यावरच कळेल. आपल्या या व्यक्तिरेखेविषयी रुषद सांगतो, “या मालिकेत मी एका श्रीमंत, प्रतिष्ठित आणि कोणाचीही कारकीर्द घडविण्याची आणि बिघडविण्याची ताकद असलेल्या एका संगीतकाराची भूमिका रंगवत आहे. या मालिकेत माझा प्रवेश हा एक विशिष्ट हेतू मनात ठेवून करण्यात आला असून माझ्या प्रवेशानंतर मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माझ्या एंट्रीनंतर एका चांगलाच धक्का बसेल. तसेच त्यांची उत्सुकताही चाळविली जाईल. माझी भूमिका नक्की काय आहे, याबद्दल मला सुस्पष्ट कल्पना देण्यात आल्यामुळे या व्यक्तिरेखेला मी माझा वैयक्तिक स्पर्श दिला आहे.”

रुषदची निवड रातोरात करण्यात आली आणि त्याच्या व्यक्तिरेखेची पटकथा इतकी उत्कृष्ट होती की, रुषदला नाही म्हणताच आले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रुषदच्या एंट्रीनंतर कुल्फीच्या जीवनाला आणखी एक कलाटणी मिळणार आहे. ती काय असेल हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. 

Web Title: Rushad Rana entry in Kullfi Kumarr Bajewala