"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:14 IST2025-07-11T13:14:03+5:302025-07-11T13:14:39+5:30
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केला आनंद

"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...
Aadesh Bandekar On Uddhav Raj Thackeray Reunion: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आता एक झाले आहेत. ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र येत मेळावा घेतला. या मेळाव्यात दोन्ही बांधवांचं मनोमिलन झालं. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच पंढरीच्या वारीत बंधू भेटीचा अनुभवदेखील त्यांनी सांगितला.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल सकाळला दिलेल्या मुलाखतीत आदेश बांदेकरांनी आनंद व्यक्त केला. "दोन भावांची भेट झाली आणि या भेटीचं निमित्त ज्ञानेश्वरांची मराठी ठरली. मी त्या वेळी पालखीबरोबर चालत होतो", असं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या. वारीतील अनुभव सांगताना आदेश बांदेकर म्हणाले, "आम्ही दिवसभर म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री एक-दीड वाजेपर्यंत वारीत असायचो. वारीत बऱ्याच ठिकाणी रेंज नव्हती. सगळे वारकरी आम्ही एका क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो",
"तो क्षण म्हणजे सोपानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचा योग. सोपान महाराजांची पालखी थांबलेली असते. मग संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि तिथे त्या दोन बंधूंची भेट होते. त्यानंतर सोपानदेव महाराजांकडून एक श्रीफळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथावर दिलं जातं. जेव्हा ती बंधूभेट होते, तेव्हा तो टाळ आणि मृदुंगाचा जयघोष, आनंद आणि जल्लोष मी अनुभवला".
पुढे आदेश बांदेकर म्हणाले, "कोणत्याही कुटुंबातली बंधूभेट ही व्हायलाच पाहिजे. दोन भावांच्या भेटीचं अलौकिक प्रेम मी तिकडे अनुभवलं. तिथे ती भेट झाली आणि इकडे ठाकरे बंधूंची भेट झाली. या योग्य आहे, हा संकेत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं ज्यासाठी होत होतं, ते ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठी. त्याच ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर आम्ही चालत होतो. अजून काय हवं" या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला.