'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:31 IST2025-08-07T14:30:58+5:302025-08-07T14:31:18+5:30
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (Shiva Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. उद्या या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे.

'शिवा' मालिकेला निरोप देताना पूर्वा कौशिक झाली भावुक, म्हणाली-"डोळे पाणावले आहेत पण.."
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'शिवा' (Shiva Serial) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. उद्या या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. या मालिकेत शिवाच्या भूमिकेत पूर्वा कौशिक पाहायला मिळाली. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने मालिकेच्या अविस्मरणीय आठवणीबद्दल सांगितले.
पूर्वा कौशिकने 'शिवा' मालिकेतील काही व्हिडीओ शेअर करत लिहिलेे की, ''एक पर्व संपलं.. ८ऑगस्ट ला म्हणजे उद्या शिवा मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट होईल... सगळंच भरून आलंय.. खूप काही दिलंस गं शिवा... प्रेम, आपलेपणा, हक्क, कणखर असणं खूप काही ...कसा प्रवास सुरू झाला हा आणि आता शेवटच्या टप्प्यात आलोय आपण.. ऑडिशन ते मालिका पूर्ण होईपर्यंतचा प्रवास खूप मोठा मजेशीर ,कठीण ,अनेक चढउतार असलेला , हिमतीचा, संयमाचा होता. आता झोळी भरली आहे आठवणींनी.. डोळे पाणावले आहेत पण मनात एक फक्त एक भावना आहे कृतज्ञता...''
तिने पुढे लिहिले की, ''तुझं रोखठोक आणि निर्भीड असणं माझ्या अंगात आहे... पण तुझ्यासारखा आत्मविश्वास आणि संयम ही माझ्यात असावा अस वाटतंय..!!! माझ्या ह्या २ वर्षाच्या काळात प्रत्येक सुख दुःखात तू आधार होतीस माझा.. बऱ्याचदा रडू आलं तेव्हा तेव्हा तू होतीस सोबत आणि माझं मन हलकं केलंस... राग, रडणं, हसणं, मस्ती करणं सगळं तुझ्या पुढ्यात केलं..हक्काने सोबत केलीस मला.. एवढा संयम कसा काय आहे तुझ्यात. मला प्रश्नच पडतो बुवा...पण ह्या सगळ्यासाठी थँक्यू म्हणाले तर रागवशील मला माहितीये पण थोडी भीती वाटतेच आहे.. जातेस ना तू, शिफ्ट होतेस म्हणे! असो हे असं बोलणं होत राहील पण आभारी आहे आणि आय लव्ह यू शिवा... ह्या प्रवासात आपण एकत्र घडत होतो.. कधी तू मला ओरडायचीस कधी मी तुला जवळ घ्यायचे.. असे आलो आपण एकत्र प्रवास करत.... तू होतीस म्हणून सगळ्या गोष्टी अंगावर घेऊ शकले.. खूप काही शिकवून चालली आहेस म्हणून थँक्यू...!!''
''ह्या प्रवासादरम्यान बर्याच नवीन गोष्टींचा अनुभव मला घेता आला. माझ्यासाठी जणू एका पर्वतारोहण ( मोठा डोंगर चढण्यासारखा ) होता हा प्रवास, प्रत्येक फायटिंग सीक्वेन्स एक नवीन आव्हान घेऊन यायचा. तुझ्या या धैर्याने मला खऱ्या अर्थाने ताकदीचा अर्थ म्हणजे काय हे कळलं. संकटांना न घाबरता त्यांचा सामना करणं , म्हणजे धैर्य असणे.. हे वाक्य तुझ्यामुळेच मी बोलू शकले प्रत्येक मुलीच्या हृदयात असावं असं हे धैर्य होतं आणि आहे तुझ्यात.. अॅक्शन सीन शूट करताना माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे, पण प्रत्येक सीनमधून मी स्वतःला नव्याने शोधत गेले. या सगळ्याने मला माझ्या मर्यादांना ओलांडायला शिकवलं.
प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाने शिवा तुमच्या घराघरात पोहोचली.. या कथेमुळे माझा तुमच्याशी एक अतुट नातं जोडल गेलं आहे.. आणि हे नातं मी आयुष्भर जपून ठेवीन..!! तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मनाच्या एका कोपर्यात ही भावना नक्की आहे की हा शेवट नसून , ही एका सुंदर प्रवासाची नवी सुरुवात आहे. मी आयुष्यभर तुम्हा सगळ्यांची ऋणी राहीन. झी मराठी तुमची मी आभारी आहे'', असे पूर्वाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.