दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:40 IST2025-09-02T12:39:18+5:302025-09-02T12:40:03+5:30
दशावतार सिनेमाच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी प्रियदर्शनने तात्या विंचूचं स्किट सादर केलं.

दिलीप प्रभावळकरांना भेटून भारावला प्रियदर्शन जाधव; पोस्ट लिहित म्हणाला, " पाय लटपटत होते..."
येत्या काही दिवसात दर्जेदार मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकीच एक 'दशावतार'. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिलीप प्रभावळकरांचा (Dilip Prabhavalkar) लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी, अभिनय बेर्डे अशी सिनेमात स्टारकास्ट आहे. नुकतीच या सिनेमाची टीम 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती. तेव्हा लेखक, अभिनेता प्रियदर्शन जाधवने (Priyadarshan Jadhav) स्किट सादर केलं. तसंच दिलीप प्रभावळकरांना भेटून त्याला खूप आनंद झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रियदर्शनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले, "दशावतार चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर, दिग्दर्शक सुबोध खानोलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, विजय केंकरे, सुनील तावडे चला हवा येऊ द्या च्या मंचावर आले होते. दिलीप प्रभावळकरांनी अजरामर केलेला तात्या विंचू , त्यांच्यासमोरच सादर करायचा ह्याचे प्रचंड दडपण होते. एरवी कुठल्याही परफॉर्मन्सच्या आधी एक बारीक दडपण असतं पण यावेळी पाय अगदी लटपटत होते. पण दिलीप भैय्यांनी कौतुक केलं. डोळे भरून आले. तुझ्यात ती ताकद आहे धमक आहे. उत्तम अभिनय करायची तीव्र इच्छाशक्ती आहे आणि ते तुला जमेल असं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. महेश सरांनी सुद्धा भरभरून कौतुक केलं. त्यानिमित्ताने जो सिनेमा २५-३० वेळा पाहिला त्यातला तात्या विंचू करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो."
"दिलीप काकांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या छातीवर हात ठेवून ओम फट स्वाहा केलं होतं, मी अभिनयच्या छातीवर हात ठेवला. प्रभावळकर आणि बेर्डे यांच्यातला एक टक्का गुण जरी मला लाभला तरी खूप झालं ! ओम फट स्वाहा !
दिलीप भैय्या , सुबोध , महेश सर , सिद्धार्थ , सुनील काका , अभिनय , प्रियदर्शनी तुम्हाला सर्वांना सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा. सिनेमा धो धो चालू दे महाराजा!" सुबोध तुझा पहिलाच सिनेमा आहे. अशीच भरारी घे ! — तुझा दर्शन.
'हे स्किट लाईव्ह बघणं म्हणजे पर्वणी होती', 'कडक परफॉर्मन्स' अशा शब्दात प्रियदर्शनचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. 'दशावतार' १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कोकणातील लोकप्रिय लोकनाट्य प्रकार दशावतार वर सिनेमाची ही गूढ कहाणी आधारित आहे.