"मी मुद्दाम नकारात्मक भूमिका करते...", अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:30 IST2025-05-25T13:30:02+5:302025-05-25T13:30:24+5:30
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नकारात्मक भुमिका निवडण्यामागचं कारण सांगितलं.

"मी मुद्दाम नकारात्मक भूमिका करते...", अपूर्वा नेमळेकर नेमकं काय म्हणाली?
Apurva Nemlekar: 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमी चर्चेत असते. या मालिकेत तिने उत्कृष्ट खलनायिका साकारली आहे. ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकतीच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं नकारात्मक भुमिका निवडण्यामागचं कारण सांगितलं.
अपूर्वाने नुकतंच जयंती वाघधरे हिच्या 'आम्ही असं ऐकलंय' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तिनं नकारात्मक भुमिकांबद्दलचा तिचा दृष्टिकोन शेअर केला. ती म्हणाली, "२०११ ते २०१७ पर्यंत मी घरची लाडकी मुलगी, आदर्श सून, प्रियसी अशा गोड आणि पारंपरिक सकारात्मक भूमिका साकारल्यात. त्या काळात मी जे काही पात्रं साकारली, ती इतकी गोंडस आणि सहनशील होती की मला वाटायचं, कोण एवढं बावळट असतं? तिला काही समजत नाही का? सगळ्यांचं बोलणं तिला योग्य वाटतं, अगदी खलनायकाचंही! आणि स्वतःबद्दल मात्र ती कायम गोंधळलेली. अशा भूमिकांमधून चुकीची प्रेरणा जाऊ शकते, हे लक्षात आलं आणि मी ठरवलं की आता काहीतरी वेगळं करायचं," असं अपूर्वानं स्पष्ट केलं.
ती पुढे म्हणाली, "त्यानंतर जवळपास तीन वर्ष मी एका सशक्त भूमिकेची वाट पाहिली आणि 'रत्रीस खेळ चाले' या मालिकेत 'शेवंता'चं पात्र माझ्या वाट्याला आलं. हे पात्र केवळ नकारात्मक नव्हतं, तर खूपच धुर्त, कणखर आणि विचारसंपन्न होतं. त्यात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. शेवंता साकारताना मला अपार आनंद मिळाला. शेवंता साकारताना मला मजा येत होती. मग मी ठरवलं की यानंतर आपल्याला सकारात्मक भुमिका करायच्याच नाहीत. आता प्रेमाची गोष्ट या मालिकेत जे मी सावनी पात्र साकारतेय, हे मी मुद्दाम निवडलेलं पात्र आहे", असंही ती म्हणाली.
अपूर्वा नेमळेकरने २०११ साली झी मराठीवरील 'आभास हा' या मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'तू माझा सांगाती', 'तुझं माझं जमतंय', 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' यांसारख्या मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. अपूर्वाने 'इश्क वाला लव्ह', 'रावरंभा' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'चोरीचा मामला', 'आलाय मोठा शहाणा' यांसारख्या नाटकांमध्येही ती झळकली आहे. २०१४ साली अपूर्वाने रोहन देशपांडे यांच्याशी विवाह केला होता, मात्र काही वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला.