प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:51 IST2025-11-16T12:35:15+5:302025-11-16T12:51:21+5:30
'बिग बॉस'मध्ये राडा! सलमान नाही, पण रोहित शेट्टीनं 'वीकेंड का वार' गाजवलं

प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला!
Pranit More Roast Rohit Shetty : 'बिग बॉस १९' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील प्रत्येक सदस्य शोमध्ये टिकून राहण्यासाठी युक्त्या लढवताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात अनेक गोष्टी बदललेल्या दिसल्या. आता आणखी एक सरप्राइज चाहत्यांना मिळालं. दर आठवड्याला सलमान खानच्या 'वीकेंड का वार'ची वाट बघणाऱ्या चाहत्यांसाठी यंदा थोडं वेगळं सरप्राइज होतं. लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी हा 'बिग बॉस १९'मध्ये दिसला आहे.
यंदाच्या आठवड्यात सलमान 'वीकेंड का वार'मध्ये दिसला नाही. सलमान खान सध्या त्याच्या 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे यंदाचा 'वीकेंड का वार' रोहित शेट्टी होस्ट करतोय. जिओ हॉटस्टारने एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात दिसतं की रोहित शेट्टीने घरात येताच स्पर्धक प्रणित मोरेला त्याच्यावर स्टँड-अप कॉमेडी करण्याचा टास्क दिला. प्रणितने माइक हातात घेतला आणि एकदम बिनधास्तपणे बोलणं सुरू केलं. त्याने रोहित शेट्टीच्या चित्रपटांवर आणि त्याच्या 'खतरों के खिलाडी'च्या होस्टिंगवर एकदम 'रोखठोक' पण विनोदी टोलेबाजी केली.
प्रणित म्हणाला,"रोहित सर भारी टॅलेंटेड आहेत. 'खतरों के खिलाडी' होस्ट करताना ते खूप शोभून दिसले. ते चालत्या गाडीतून उडी मारतात, पण सगळ्यात मोठा धोका त्यांनी उचलला, तो म्हणजे 'दिलवाले' चित्रपटावर १०० कोटी रुपये खर्च करणं!". हे ऐकून रोहित शेट्टीलाही हसू आवरलं नाही. त्याने लगेच प्रणितला करेक्ट करत सांगितलं, "अरे बाबा, १०० नाही, १५० कोटी होते!".
प्रणित मोरे इथेच थांबला नाही. त्याने रोहितच्या 'सिंघम' चित्रपटांवरही जोरदार 'पंच' मारला. तो म्हणाला, "रोहित सर पोलिसांचा खूप आदर करतात, म्हणून त्यांच्या प्रत्येक सिनेमात पोलीस हे केंद्रस्थानी असतात. पोलिससुद्धा त्यांचा इतका आदर करतात की, चेकपॉईंटवर रोहित सर स्वतः पोलिसांच्या गाड्या चेक करतात आणि पोलीस हे रोहित सरांना म्हणतात, 'जाऊ द्या ना साहेब". प्रणितच्या विनोदांवर सगळेच खळखळून हसले.