'मी तुम्हाला खूप मानतो' म्हणणाऱ्या प्रणित मोरेने अजय देवगणवरही केला होता जोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:22 IST2025-11-11T17:21:05+5:302025-11-11T17:22:32+5:30
प्रणित मोरेने एका स्टॅण्डअप शोमध्ये अजय देवगणच्या डान्स स्टेपवरुन जोक केला होता. बघा व्हिडीओ

'मी तुम्हाला खूप मानतो' म्हणणाऱ्या प्रणित मोरेने अजय देवगणवरही केला होता जोक
'बिग बॉस १९'च्या 'वीकेंड का वार'मध्ये नुकतीच अजय देवगणने हजेरी लावली होती. त्याच्या आगामी 'दे दे प्यार दे २'च्या प्रमोशनसाठी तो 'बिग बॉस'मध्ये आला होता. यावेळी अजयने प्रणित मोरेला 'माझ्यावर तर जोक केले नाहीस ना कधी?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रणितने 'नाही, मी तुम्हाला खूप मानतो' असं सांगितलं होतं. त्याचं उत्तर ऐकून एकच हशा पिकला. सलमान खानही बघतच राहिला. मात्र आता नेटकऱ्यांनी प्रणित मोरेचा अजय देवगणवर जोक करतानाचा व्हिडीओ शोधून काढला आहे.
प्रणित मोरेने एका स्टॅण्डअप शोमध्ये अजय देवगणच्या डान्स स्टेपवरुन जोक केला होता. अजयचा 'सन ऑफ सरदार २' काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. यामध्ये 'पहला तू दुजा तू' हे गाणं आहे. यावर अजय आणि मृणाल ठाकुरने डान्स स्टेप केली आहे. ही डान्स स्टेप खूपच व्हायरल झाली आणि लोकांनी अजयला पुन्हा एकदा खूप ट्रोल केलं. याआधीही अजयचं 'बस तेरे बस तेरे धूमधाम' हे गाणंही सोप्या डान्स स्टेपमुळे असंच व्हायरल झालं होतं. प्रणित मोरेने स्टॅण्डअप शोमध्ये अजयची चांगलीच खिल्ली उडवलेली व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बिग बॉस १९ च्या पहिल्याच आठवड्यात सलमान खानने प्रणितला धारेवर धरलं होतं. सलमानने ते प्रत्येक जोक पाहिले होते. त्यावरुनच सलमानने प्रणितला चार शब्द सुनावले होते. 'तुझं घर माझ्यामुळेच चालतं वाटतं' असं तो म्हणाला होता. नंतर अनेक पाहुण्यांनी प्रणितला 'माझ्यावर तर जोक केला नाहीस ना?' असा प्रश्न विचारला. अजयनेही यावेळी तोच प्रश्न विचारला होता.
प्रणित मध्यंतरी बिग बॉसमधून गायब होता. तब्येतीच्या कारणामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आलं होतं. प्रणित घराबाहेर पडला अशीच सगळीकडे चर्चा झाली. मात्र काहीच दिवसात त्याने पुन्हा घरात एन्ट्री घेतली. प्रणित पुन्हा बिग बॉसमध्ये आल्याने प्रेक्षकही खूश झालेत.