"स्वत: महिला आणि नाव 'अदिती' असल्याने...", प्राजक्ता माळीला अदिती तटकरेंचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:19 IST2023-10-23T11:16:42+5:302023-10-23T11:19:50+5:30
"काल आम्ही खूप मज्जा केली", प्राजक्ता माळीने अदिती तटकरेंंबद्दल केलेली पोस्ट चर्चेत

"स्वत: महिला आणि नाव 'अदिती' असल्याने...", प्राजक्ता माळीला अदिती तटकरेंचं कौतुक, शेअर केली खास पोस्ट
प्राजक्ता माळी हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच सौंदर्याने प्राजक्ता चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबद्दल प्राजक्ता पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. सध्या प्राजक्ताच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
प्राजक्ताने नुकतंच एका नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेही उपस्थित होत्या. प्राजक्ताने या कार्यक्रमातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अदिती तटकरेंबरोबरचे फोटोही प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्राजक्ताने त्यांचं कौतुक करणारी पोस्टही लिहिली आहे. 
 
"महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य की आयुष्यभरासाठी मैत्रीण? मा. अदितीताई तटकरे. स्वत: महिला आणि नाव अदितीच असल्याने महिलांचे प्रश्न जाणून स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व यांच्यात आहेच. बरोबरीनं दिव्यदृष्टी, दयाळूवृती, त्वरीत निर्णय घेण्याची क्षमता आणि उत्तम स्मरणशक्ती यामुळे मी प्रेरित झाले. त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. काल रात्री आम्ही खूप मज्जा केली. आपल्या भावना जुळतात. आपण असंच भेटून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेवर एकत्र काम केलं पाहिजे. काय वाटतं?", असं प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. तिने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणाही आहे. 'रानबाजार' या वेब सीरिजमध्येही प्राजक्ता झळकली होती.
