प्राजक्ता गायकवाड आई तुळजाभवानीच्या चरणी! सहकुटुंब घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:42 IST2026-02-18T14:41:22+5:302026-02-18T14:42:00+5:30
प्राजक्ताने आपल्या कुटुंबासह तुळजापूर गाठलं. तिने यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म आणि कुलाचाराचे सर्व विधी पार पाडले.

प्राजक्ता गायकवाड आई तुळजाभवानीच्या चरणी! सहकुटुंब घेतलं दर्शन
Prajakta Gaikwad Tulja Bhavani Temple Visit 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून 'महारानी येसूबाई' म्हणून घराघरात पोहोचलेली लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. प्राजक्ता गायकवाड ही काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. प्राजक्ता आणि तिचा पती शंभुराज खुटवड यांच्या या शाही विवाहसोहळ्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले होते. अशातच आता प्राजक्तानं आज कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
प्राजक्ताने आपल्या कुटुंबासह तुळजापूर गाठलं. तिने यावेळी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म आणि कुलाचाराचे सर्व विधी पार पाडले. आई भवानीची आरती करून तिने देवीची ओटी भरली. यावेळी तिने देवीकडे आपल्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या सुख-समृद्धीसाठी साकडं घातलं. नेहमीच ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या प्राजक्ताला पाहण्यासाठी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीचं प्राजक्तानं तिची लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत खास घृष्णेश्वर मंदिरात साजरी केली होती. पती शंभुराज खुटवडसह ती खास घृष्णेश्वर मंदिरात गेली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट्स देत असते. प्राजक्ता हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेशिवाय तिने 'आई माझी काळूबाई' या मालिकेतही काम केलं आहे. 'लॉकडाऊन लग्न', 'सिंगल' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. नुकतंच तिचा 'स्मार्ट सुनबाई' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.