नंदीवरून एन्ट्री घेतल्यानं प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज ट्रोल, Video व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:56 IST2025-12-03T14:55:49+5:302025-12-03T14:56:09+5:30
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज यांची ही कृती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर चाहते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

नंदीवरून एन्ट्री घेतल्यानं प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज ट्रोल, Video व्हायरल!
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे. तिला खऱ्या आयुष्यातही शंभुराज मिळाले आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा काल २ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. हा विवाह सोहळा त्यांच्या राजेशाही थाटासाठी सध्या चर्चेत आहे. लग्नाचे अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असतानाच, शंभुराज आणि प्राजक्ता यांच्या एन्ट्रीच्या एका व्हिडीओमुळे हे जोडपे प्रचंड ट्रोल होत आहे.
लग्नातील थाटामाटानंतर त्यांचे रिसेप्शनदेखील भव्य झालं. रिसेप्शनसाठी प्राजक्तानं लाल रंगाची अतिशय सुंदर भरजरी साडी नेसली होती. तर शंभुराजनं लाल साडीला मॅच करणारी मोती रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी प्राजक्ता आणि शंभुराज यांनी रिसेप्शनला एका भव्य नंदीवर स्वार होऊन एन्ट्री घेतली. त्यांच्यापुढे भगवान शंकर आणि गण चालत आहेत असा देखावा निर्माण करण्यात आला होता. या वेळी फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. पण, अशी एन्ट्री घेतल्यानं काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नाच्या भव्यतेमुळे कौतुक झालेले हे जोडपे आता त्यांच्या या एका कृतीमुळे जोरदार ट्रोलिंगला सामोरे जात आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'आई माझी काळूबाई', 'स्वराज्यरक्षक संभाजी' अशा मालिकांमध्ये दिसली. नुकताच तिचा 'स्मार्ट सूनबाई'हा सिनेमाही रिलीज झाला. तर तिचा पती शंभुराज खुटवड हा एक बिझनेसमन आहे.