जिजाऊ, येसूबाई ते ताराराणी... स्वराज्यातील स्त्रीशक्तीवर प्राजक्ता गायकवाडचं भाष्य, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:50 IST2026-02-19T16:49:08+5:302026-02-19T16:50:40+5:30
प्राजक्ता नेहमीच महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल भरभरून बोलत असते.

जिजाऊ, येसूबाई ते ताराराणी... स्वराज्यातील स्त्रीशक्तीवर प्राजक्ता गायकवाडचं भाष्य, म्हणाली...
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड प्रेक्षकांची खुपच लाडकी आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि ऐतिहासिक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात तिनं स्थान निर्माण केलंय. प्राजक्ता नेहमीच महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल भरभरून बोलत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने शिवरायांच्या स्वराज्यात महिलांचा किती आदर केला जात होता, यावर भाष्य केलं. तसेच तिनं सध्याच्या काळात स्त्रीयांना दिल्या जाणाऱ्या सन्मानाबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
अभिजात मराठी ओटीटीशी बोलताना प्राजक्ता म्हणाली की, "जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, तेव्हा त्यांना घडवणाऱ्या या राजमाता जिजाऊसाहेब होत्या. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांसोबत महाराणी येसूबाई खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या. छत्रपती संभाजी महाराज गेले तरीदेखील महाराणी येसूबाईं या एकोणतीस वर्षं स्वराज्य अबाधित राहावं म्हणून औरंगजेबाच्या कैदेत होत्या".
पुढे ती म्हणाली, "त्या गेल्यानंतरसुद्धा महाराणी ताराराणी साहेबांनी स्वराज्य सांभाळलं. तर इतका ताकदीचा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या मातीला आहे आणि या सगळ्या स्त्रिया होत्या. म्हणजे आपण म्हणतो की जिजाऊसाहेब नसत्या तर शिवाजी महाराज नसते. तर मग असं वाटतं की या सगळ्या महिलांचा आपल्याला इतिहास आहे. तर मग त्यावेळेस स्वराज्यामध्ये जी किंमत महिलांना होती, तीच आत्तासुद्धा पाहिजे".