जालन्याचा डॉन प्रभु शेळकेची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; संघर्षाची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:50 IST2026-01-11T21:48:57+5:302026-01-11T21:50:06+5:30
घरची गरीबी, थॅलेसेमिया आजाराशी झुंज देत गाठला 'बिग बॉस'चा मंच, जालना जिल्ह्याचा सुपुत्र प्रभु शेळके आता महाराष्ट्राला हसवणार!

जालन्याचा डॉन प्रभु शेळकेची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री; संघर्षाची कहाणी ऐकून रितेशही झाला भावुक
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. एकानंतर एक स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेत आहेत. सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईलने आणि मजेशीर व्हिडीओंनी लाखो चाहत्यांची मनं जिंकणारा प्रभु शेळके आता 'बिग बॉस मराठी ६' चा स्पर्धक म्हणून घरामध्ये दाखल झाला आहे. साध्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रभुने आज थेट 'बिग बॉस'च्या मंचापर्यंत मजल मारली आहे.
प्रभु शेळके हा त्याच्या रीलसाठी प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर आल्यावर त्याने आपली ही हौस पूर्ण केली. त्याने चक्क होस्ट रितेश देशमुखसोबत एक धमाकेदार रील बनवली. यावेळी 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करताना त्यानं मेहनत आणि शॉर्टकट या पर्यायापैकी मेहनतीच दार निवडलं.
प्रभु शेळके जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड गावचा अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे. त्याला थॅलेसेमिया हा गंभीर आजार आहे. दर महिन्याला त्याला रक्त बदलून घ्यावे लागते. त्याच्या उपचारासाठी जवळपास २५ लाखांचा खर्च आहे. हे पैसे आता स्वतःच कमवायचे हा निश्चय करून प्रभुने 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेतली आहे. इतक्या मोठ्या आजाराशी झुंज देत असतानाही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतो. आता बिग बॉसच्या घरात प्रभु शेळके किती दिवस टिकतो, हे पाहणे रंजक ठरेल!