"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:08 IST2025-11-26T14:07:32+5:302025-11-26T14:08:33+5:30
Pooja Birari And Soham Bandekar : 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये मंजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारीदेखील लवकरच लग्न करणार आहे. ती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची सून होणार आहे. नुकतेच मालिकेच्या सेटवर तिच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला.

"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच 'लक्ष्मीनिवास' मालिकेतील मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. २५ नोव्हेंबरला 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अंजीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभार गोकुळ दशवंतसोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यानंतर आता मराठी कलाविश्वातील आणखी काही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकणार आहेत. 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेमध्ये मंजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारीदेखील लवकरच लग्न करणार आहे. ती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची सून होणार आहे. नुकतेच मालिकेच्या सेटवर तिच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिने सोहम बांदेकरच्या नावाचा हटके उखाणा घेतला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकतेच सूचित्रा बांदेकर यांच्या इंडस्ट्रीतील मैत्रिणींनी सोहमचं केळवण केलं होतं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता पूजा बिरारीचे सुद्धा येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर केळवण पार पडले आहे. या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी तिने घेतलेला हटके उखाणादेखील चर्चेत आला आहे.
पूजा बिरारीने सोहम बांदेकरच्या नावाने उखाणा घेताना म्हटले की, " घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे आहो म्हणजेच सोहम आता होणार माझे मिस्टर!". पूजाचा उखाणा ऐकून सेटवरील सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तसेच तिला गिफ्ट म्हणून साडीदेखील भेट दिली. सध्या सोहम आणि पूजाच्या केळवणाचे फोटो पाहायला मिळत असले तरी त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. मात्र त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.