ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दणक्यात कमबॅक; प्राजक्ता माळीसोबतचा प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:41 IST2025-10-14T09:40:52+5:302025-10-14T09:41:20+5:30
ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा हा दुप्पट बोनस मिळणार आहे.

ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दणक्यात कमबॅक; प्राजक्ता माळीसोबतचा प्रोमो व्हायरल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने याच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुप्पट बोनस मिळणार आहे. कारण, ओंकार भोजनेची अखेर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी झाली आहे. आता सोनी मराठी वाहिनीने ओंकारच्या कमबॅकचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या रंगमंचावर ओंकारच्या एन्ट्रीच्या पहिलावहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शोची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी आणि ओंकार एकत्र दिसून येत आहेत. प्राजक्ता माळी ओंकारची नव्याने ओळख करुन देत म्हणते की, "ज्याला तुम्ही मिस करत होता, तो पुन्हा येतोय... आता हा आवाज पुन्हा रंगणार. मामांचा मामा, कोकणचा सन्मान आणि विनोदाची शान... ओंकार भोजने परत येणार आणि विनोदाचा बोनस डबल होणार". ओंकार भोजने आणि प्राजक्ता माळी यांच्यातील जुन्या केमिस्ट्रीची झलक पुन्हा एकदा या प्रोमोमध्ये पाहायला मिळाली.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्येच का सोडली?
ओंकार भोजनेने मधल्या काळात या शोमधून ब्रेक घेतला होता. २०२२ च्या अखेरीस ओंकार भोजनेने अचानक या शोमधून माघार घेतली होती. सिनेमाचं शूटिंग आणि प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं त्याने मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. ज्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतर त्याने कलर्स मराठीवर 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' यासारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले होते. तसेच त्यानं 'बॉइझ २', 'बॉइझ ३', 'घे डबल', 'सरला एक कोटी', 'एकदा येऊन तर बघा', 'जुनं फर्निचर' या चित्रपटातही काम केले आहे. आता नम्रता संभेराव, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात आणि इतर सगळ्याच कलाकारांसोबत ओंकारची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.