प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:23 IST2025-12-28T12:22:16+5:302025-12-28T12:23:01+5:30
कोण आहे ही अभिनेत्री? विनयभंगाचा खोटा आरोप करत बिल्डरला लुटण्याचा प्रयत्न

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
मुंबई गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच खंडणीच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक केली. त्यातील एक महिला ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची सून आहे. या महिलांनी एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. लोअर परळ परिसरात १.५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना या महिलांना रंगेहात पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या महिलांचं नाव हेमलता पाटकर (३९) आणि अमरिना जव्हेरी (३३) आहे. हेमलता ही 'आई कुठे काय करते' मालिकेत कांचन देशमुखच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून आहे. या दोन्ही महिलांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात त्यांचा एक साथीदार अजूनही फरार आहे. हे प्रकरण नोव्हेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीतलं आहे. बिल्डरच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाइटच्या वापरावरून या महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता ज्याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले.
या वादानंतर २३ नोव्हेंबर रोजी महिलांनी आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १० कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम ५.५ कोटी रुपयांवर ठरली. ५२ वर्षीयबिल्डरने (गोयल अँड सन्स इन्फ्रा एलएलपीशी संबंधित) या त्रासाला कंटाळून गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचून २३ डिसेंबर रोजी लोअर परळ येथे दीड कोटी रुपये स्वीकारताना या महिलांना अटक केली. आरोपींनी बिल्डरच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि सोशल मीडिया व इतर माध्यमांतून कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी या महिलांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, धमकी देणे, ब्लॅकमेल करणे आणि खंडणी मागणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.