'मुलगी झाली हो' मालिकेतली माऊ दिसणार ‘आनंदी’च्या भूमिकेत, म्हणाली- सर्वात महत्त्वाची गोष्ट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:54 IST2023-04-10T11:53:47+5:302023-04-10T11:54:38+5:30
स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मुलगी झाली हो' मालिकेतली माऊ दिसणार ‘आनंदी’च्या भूमिकेत, म्हणाली- सर्वात महत्त्वाची गोष्ट..
स्टार प्रवाह वाहिनी लवकरच घेऊन येतेय नवी मालिका मन धागा धागा जोडते नवा. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांमधून स्टार प्रवाहने वेगळा विषय हाताळत मनोरंजन विश्वात नवा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे.
स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या मन धागा धागा जोडते नवा या नव्या मालिकेत दिव्या आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. इतरांना भरभरुन आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे.
या नव्या भूमिकेविषयी सांगताना दिव्या म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझ्या आयुष्यातली मी पहिली मालिका केली होती. पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना आनंद होतोय. मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आलेय त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे.