का सोडलं अमेरिकेचं सुख? मृणाल दुसानिसनं सांगितलं मायदेशी परतण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:54 IST2025-10-07T09:53:53+5:302025-10-07T09:54:17+5:30
मृणाल आणि तिचा पती नीरजने अमेरिका सोडून भारतात परतण्यामागचं खास आणि भावनिक कारण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

का सोडलं अमेरिकेचं सुख? मृणाल दुसानिसनं सांगितलं मायदेशी परतण्यामागचं कारण
Mrunal Dusanis America To India: मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'तू तिथे मी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमधून ती घराघरातप पोहचली. मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिलखुलास चेहरा म्हणून तिला ओळखले जाते. मृणालने आपल्या सुंदर अभिनयाने आणि निरागस चेहऱ्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. लग्नानंतर मृणाल ही अमिरेकत स्थायिक झाली होती. पण, आता पती आणि लेकीसह तब्बल ४ वर्षांनी भारतात परतली. भारतात येताच मृणालने 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेमधून कमबॅकही केलंय. अशातच आता मृणाल आणि तिचा पती नीरजने अमेरिका सोडून भारतात परतण्यामागचं खास आणि भावनिक कारण नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
नुकतंच मृणाल आणि नीरज यांनी 'द अनुरुप शो'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मृणालने खुलासा केला की, त्यांच्या मायदेशी परतण्यामागचे मुख्य कारण त्यांची लेक नुर्वी आहे. नुर्वीचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी, तिला भारतात, कुटुंबाच्या जवळ आणि भारतीय संस्कृतीच्या वातावरणात मोठं करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. परदेशातील सुखसोयींपेक्षा आपल्या मुलीला भारतीय संस्कारांचे आणि कुटुंबाचा आधार मिळावा, हे या जोडप्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे नुर्वीच्या भविष्याचा विचार करून त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. नीरज आणि मृणाल यांनी मायदेशी परतण्याचा 'टाईमिंग' फार विचारपूर्वक निवडला. नुर्वी अजून लहान आहे, तिला अमेरिकेची सवय होण्याआधीच तिला भारतीय वातावरणात जुळवून घेता यावे, हा या जोडप्याचा मुख्य उद्देश होता.
नीरज म्हणाला, "मी जवळपास १४ वर्षे अमेरिकेत होतो. मास्टर्सची २ वर्ष आणि पुढे १२ वर्ष नोकरी करत होतो. पण, अमेरिकेत राहूनही मला हे कुठे ना कुठे माहीत होतं की, आपल्याला पुन्हा भारतात जायचं आहे. इथे पुन्हा आल्यावर मला आयटीमध्ये काम करायचं नव्हतं. याउलट मला स्वत:चं काहीतरी सुरू करायचं होतं. अर्थात बिझनेसकडे कल होता आणि त्यात मृणालची साथ मिळाली. ती नेहमी म्हणायची, आपण एकत्र बिझनेस वगैरे काहीतरी करूयात. याविषयी आम्ही खूप चर्चा करायचो. फूड ट्रक किंवा कॅफे सुरू करूयात याविषयी सुद्धा आमच्या चर्चा व्हायच्या. सध्या भारतात फूड ट्रक कल्चर त्याप्रमाणात लोकप्रिय झालेलं नाहीये. म्हणून मग आम्ही रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला".
मृणालनं सांगितलं, "जेव्हा अगदी आमचं नवीन-नवीन लग्न झालं होतं. तेव्हा सुद्धा रेस्टॉरंट सुरू करायचं याबद्दल आमची चर्चा व्हायची. आमचं मधल्या काळात असंही बोलणं झालं होतं की, मी अमेरिकेत शिफ्ट होते आपण तिथेच रेस्टॉरंट सुरू करूयात. कारण, जॉब करत असताना नीरजला ते सोयीचं पडलं असतं. याशिवाय सुरूवातीला नीरजने अनेक कॅफेजमध्ये वगैरेही काम केलं होतं. त्यामुळे त्या कामाचाही त्याला अनुभव होता. मग काही वर्षांनी नुर्वी झाली. त्यावेळी आम्ही जरा नीट विचार केला. तेव्हा असं जाणवलं की नुर्वीला अमेरिकेत मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या लोकांमध्ये जाऊयात".
मृणालनं पुढे सांगितलं की, "नीरजला सुद्धा भारतात यायची इच्छा होती. त्यामुळे मग आम्ही पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. कारण, नुर्वी सध्या लहान आहे. पण, एकदा तिला कळायला लागलं असतं तर तेथील राहणीमान आवडू लागलं असतं. त्यानंतर आम्हाला तिचा विचार करून पुन्हा भारतात येणं अवघड वाटलं असतं. पण, सध्या ती लहान आहे. त्यामुळे आताच शिफ्ट होऊयात असं आम्ही ठरवलं आणि आम्ही दोघंही वेळेत निर्णय घेऊन पुन्हा मायदेशी आलो".