पुलावर अचानक बंद पडली अभिनेत्रीची गाडी, अनोळखी तरुणानं दाखवली खरी 'माणुसकी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:27 IST2025-09-26T13:26:41+5:302025-09-26T13:27:45+5:30
अभिनेत्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून हृदयस्पर्शी अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय.

पुलावर अचानक बंद पडली अभिनेत्रीची गाडी, अनोळखी तरुणानं दाखवली खरी 'माणुसकी'
मीरा जोशी (Meera Joshi ) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मीरा जोशी सध्या चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील वाहतुकीच्या गर्दीत माजीवाडा ब्रिज फ्लायओव्हरवर मीरा जोशीची गाडी अचानक बंद पडली होती. ज्यामुळे तिला मोठा मनस्ताप झाला. मात्र, या कठीण प्रसंगात अनोळखी व्यक्तीच्या मदतीने आणि मुंबई पोलिसांच्या सहानुभूतीपूर्ण वागणुकीमुळे अभिनेत्री भारावून गेली. अभिनेत्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून हृदयस्पर्शी अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय.
मीरा जोशीने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, "काल संध्याकाळी ट्रॅफिकच्या गर्दीच्या वेळेत माझी गाडी माजीवाडा ब्रिज फ्लायओव्हरवर अचानक बंद पडली. काही वेळ थांबून मी काय करायचं हे ठरवायचा प्रयत्न केला आणि गाडी बाजूला एका लेनमध्ये उभी केली. पण, गाडी काही केल्या सुरू होत नव्हती. आजूबाजूने जाणाऱ्या गाड्यांचे चालक मात्र मला रागाने पाहत होते".
तिनं लिहलं, "हताश होऊन मी एका दुचाकीवरून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीला आवाज दिला आणि मदत मागितली. तो थांबला, माझ्याबरोबर गाडी तपासली आणि पेट्रोल टाकीला गळती असल्याचा संशय आला, ज्यामुळे पेट्रोल खाली सांडत होतं. कुठलाही विचार न करता त्याने पेट्रोल आणून देतो, म्हणजे गाडी गॅरेजमध्ये नेता येईल, असं सांगितलं".
मीरा म्हणाली, "वेळ जसा-जसा जात होता, तसे मला वाटलं तो परत येणार नाही. म्हणून मी काही मेकॅनिकना फोन केला. त्यापैकी एकाने अर्ध्या तासात येतो असं सांगितलं. वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. या वेळेत अनेक ट्रक ड्रायव्हर्स आणि काही वयोवृद्ध लोक गाडी थांबवून मदत करायला आले. पण काही तरुण मात्र जाताना शिव्या घालून गेले, की माझ्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय".
पुढे तिनं लिहलं, "मुंबई पोलीस तिथे आले. मी त्यांना ट्रॅफिक जॅम झाल्याबद्दल माफी मागितली, तर त्यांनी हसून उत्तर दिलं की "ही मशीन आहे, ती बंद पडू शकते. माफी मागायची गरज नाही". त्यांच्या समजूतदार आणि सहानुभूतीपूर्ण उत्तरामुळे माझा ताण हलका झाला. पोलीस मला गाडी ब्रिजखालपर्यंत ढकलायला मदत करणार होते, तोच तो दुचाकीवरचा माणूस मोठा पेट्रोलचा कॅन घेऊन परतला. मला आश्चर्य वाटलं, आनंद झाला आणि त्याच्या या परतण्याने मी भारावून गेलो".
मीरानं पुढे लिहलं, "पोलिसांच्या मदतीने, आम्ही समस्या त्वरित सोडवून पूल रिकामा केला. मी त्या दुचाकीस्वाराचे नीट आभार मानण्यासाठी आणि त्याने आणलेल्या पेट्रोलचे पैसे परत करण्यासाठी त्याच्या मागे गेले, मी त्याला त्याच्या मदतीसाठी अतिरिक्त पैसे देऊ केले, परंतु तो हसत हसत निघून गेला". मीरानं पोस्टमध्ये त्या अनोळखी मदतीसाठी धावलेल्या व्यक्तीला उद्देशून लिहलं, "तुझ्या नि:स्वार्थ मदतीने माझा माणुसकीवरील विश्वास पुन्हा दृढ केला. तुझा दयाळूपणा आणि उदारता प्रेरणादायी आहे. तुझ्या मदतीबद्दल मी सदैव ऋणी आहे".