घरोघरी जेवण बनवणारी मराठी इन्फ्लुएन्सर अर्चना 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये पोहोचली, कुकिंग टॅलेंट पाहून विकास खन्ना थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:47 IST2025-12-23T16:46:31+5:302025-12-23T16:47:03+5:30
'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये मराठी इन्फ्लुएन्सर पोहोचली आहे. घरोघरी जाऊन टिफीन आणि जेवण बनवणाऱ्या अर्चना धोत्रे त्यांचं कुकिंग टॅलेंट दाखवण्यासाठी 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये गेल्या.

घरोघरी जेवण बनवणारी मराठी इन्फ्लुएन्सर अर्चना 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये पोहोचली, कुकिंग टॅलेंट पाहून विकास खन्ना थक्क
'मास्टरशेफ ऑफ इंडिया' हा हिंदी टेलिव्हिजनचा सगळ्यात लोकप्रिय शो आहे. या शोचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. सर्वसामान्य लोकांना आपलं कुकिंग टॅलेंट दाखवण्याची संधी या शोमध्ये मिळते. 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चा नवा सीझन लवकरच सुरू होत आहे. या शोमध्ये परिक्षक म्हणून विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर दिसणार आहेत. 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चे काही प्रोमो समोर आले आहेत.
यंदाचा 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चा नवा सीझन हा खास असणार आहे. या सीझनमध्ये जोडीने स्पर्धकांना सहभागी व्हायचं आहे. 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये मराठी इन्फ्लुएन्सर पोहोचली आहे. घरोघरी जाऊन टिफीन आणि जेवण बनवणाऱ्या अर्चना धोत्रे त्यांचं कुकिंग टॅलेंट दाखवण्यासाठी 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये गेल्या. त्यांच्यासोबत त्यांची पार्टनर रुपाली होती. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. अर्चना यांचं कुकिंग टॅलेंट पाहून परिक्षकही थक्क झाले. कुणाल कपूरने अर्चना यांना तुम्ही काय काय जेवण बनवता असं विचारताच त्यांनी इंडियन, चायनीज, स्पॅनिश अशा पदार्थांची लिस्टच वाचून दाखवली. विकास खन्नाने अर्चना यांच्या या टॅलेंटचं कौतुक केलं. "अन्नाबाबत मी कोणाच्याच डोळ्यांत एवढं प्रेम बघितलेलं नाही", असं तो म्हणाला.
अर्चना या सर्वसामान्य घरातील आहेत. त्या घरोघरी जाऊन टिफिन आणि जेवण बनवण्याचे काम करतात. याचे छोटे व्लॉग त्या शेअर करत असतात. तर त्यांच्या जेवणाच्या रेसिपीही अर्चना युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. त्यांचे इनस्टाग्रामवर १०.८ हजार फॉलोवर्स आहेत. तर युट्यूबवर १.५७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. मास्टरशेफचा नवा सीझन ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.