अभिनय आणि दिग्दर्शनानंतर आता राजकारणात, भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:53 IST2026-01-05T16:51:58+5:302026-01-05T16:53:02+5:30
अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर अभिनेत्रीनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

अभिनय आणि दिग्दर्शनानंतर आता राजकारणात, भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर आता नाशिकच्या राजकीय आखाड्यात पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर, लोकप्रिय अभिनेत्री नुपूर सावजीनं आता जनसेवेचा विडा उचलला आहे. भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिका निवडणुकीत तरुणांना प्राधान्य देण्याचे धोरण राबवत, नुपूर सावजीला उमेदवारी दिली आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नुकतंच नाशिकला भेट दिली. यावेळी त्यांनी नुपूर सावजी आणि त्यांच्या पॅनेलची भेट घेतली. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी लिहलं, "तरुणांची पहिली पसंत भाजप... महापालिका निवडणूकीत भाजपाने विविध क्षेत्रातील तरुणांना उमेदवारी दिली आहे. नुपूर सावजी ही अभिनय क्षेत्रात काम करणारी, संस्कृतवर प्रभुत्व असलेली युवा प्रतिनिधी. भाजपने नाशिक महापालिकेत नुपूर सावजीला उमेदवारी दिली आहे. नाशिकमध्ये असताना नुपूर सावजी व ती ज्या गटात लढते त्या पॅनेलला भेटून विजयासाठी शुभेच्छा दिल्या".
अभिनेत्री नुपूर सावजी हिने 'घाडगे अँड सून', 'तुला पाहते रे', रंग माझा वेगळा यासारख्या विविध मालिका, 'वाजलाच पाहिजे' हा मराठी चित्रपट, विविध नाटके, एकांकिका यामध्ये अभिनय केला आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली नुपूर निवडणूक जिंकू शकेल का हे पाहावं लागेल.