"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:20 IST2025-07-16T17:17:19+5:302025-07-16T17:20:08+5:30
"ऑडिशननंतर २ महिने वाट पाहिली पण..." 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव
Mansi Kulkarni: 'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणली जाते. अभिनेता समीर परांजपे तसेच शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका कायम चर्चेत असते. या मालिकेत मानसी आणि तेजसच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्याशिवाय थोडं तुझं आणि थोडं माझं मधील गायत्री प्रभूची भूमिका देखील लक्षवेधी ठरत आहे. या मालिकेत गायत्रीच्या भूमिकेत मानसी कुलकर्णी पाहायला मिळते आहे. जवळपास १० वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनेत्रीने मालिकाविश्वात दमदार कमबॅक केलं आहे. त्यात सध्या ही अभिनेत्री तिने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
नुकतीच मानसी कुलकर्णीने 'राजश्री मराठी'ला दिली. या मुलाखतीमध्ये तिला तुझ्या आयुष्यातील लक्षात राहिलेलं असं कोणतं ऑडिशन होतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अभिनेत्रीने एका जाहिरातीचा किस्सा शेअर केला. त्या जाहिरातीमध्ये मानसीने इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तेव्हा मानसी म्हणाली, "मी सीएट टायअरची एक जाहिरात केली होती. त्यामध्ये इरफान खानसोबत काम केलं होतं. त्यासाठी मी खूप उत्सुक होते. खरं सांगायचं झालं तर जाहिरात हे क्षेत्र असं आहे की तिथे खूप जास्त स्पर्धा असते. बऱ्याच ऑडिशन्स दिल्यानंतर एखादी कोणती क्रॅक होते. मी त्या जाहिरातीमध्ये इरफान खान आहे म्हणून तिकडे गेलेले. ते ऑडिशन झालं आणि त्याच्यानंतर २ महिने वाट पाहिली पण काही अपडेट आली नाही. मला वाटलं ही संधी आपल्या हातून निसटली. इरफान यांच्या तारखा मिळत नव्हत्या. त्यानंतर मग मला कॉल आला की तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तरीही मी कंट्रोल केला कारण शॉर्टलिस्ट ही अशी प्रोसेस असते की ३-४ जण शॉर्टलिस्ट झालेले असतात आणि मग त्यांच्यामधून एकाची निवड केली जाते."
इरफान खानसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना मानसी म्हणाली, "माझा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायम लक्षात राहणारा आहे. त्यांच्या कामात सहजता आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जवळपास २० सेकंदाची ती जाहिरात होती. इतक्या वर्षांचा त्यांचा थिएटर आणि कामाचा अनुभव आहे तो कामात बोलतो. त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. तो माणूस ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन सारखाच आहे."