"जाड म्हणून हिणवलं, काहींनी तर... ", अपूर्वा नेमळेकरला इंडस्ट्रीत आलेला वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:41 IST2025-10-01T18:37:58+5:302025-10-01T18:41:09+5:30
फिगरमुळे अनेकांनी हिणावलं अन्; अपूर्वा नेमळेकरला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

"जाड म्हणून हिणवलं, काहींनी तर... ", अपूर्वा नेमळेकरला इंडस्ट्रीत आलेला वाईट अनुभव
Apurva Nemlekar: इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वबळावर नाव कमावलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेल्या शेवंताने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. याशिवाय अपूर्वाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, अपूर्वाने एका मुलाखतीत तिने आपल्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, करिअरच्या सुरुवातीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता, असं तिने सांगितलं.
अलिकडेच अपूर्वा नेमळेकरने नवरात्रोत्सवानिमित्त 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. दरम्यान, या मुलाखतीमध्ये अपूर्वाने तिचा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रवास आणि तिला आलेले काही वाईट अनुभव सांगितले. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपलं एक काम असं चोख असावं जे आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहावं. सुरुवातीला मी खूप सोज्वळ भूमिका साकारल्या होत्या. पण, खरंतर जे पडद्यावर दिसतं ते तसं नसतं. जेव्हा तुम्हाला त्या मुख्य कलाकारांना भेटण्याची संधी मिळते तेव्हा पाहिलं तर ते तसे नसतात. त्यांच्यावर कामाचा ताण खूप असतो. म्हणून मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि नाटकाकडे वळले. मी काही नाटकांमध्ये काम केलं आणि बऱ्याच काळानंतर शेवंताची भूमिका माझ्याकडे आली."
रिजेक्ट झाल्यानंतर खूप रडायचे...
याचदरम्यान, रिजेक्शनबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "त्यावेळी रिजेक्शन असे असायचे की, तुम्ही जाड आहात,बारीक व्हा. कधी कोणी मला म्हणायचं तुम्ही फिल्मचा, जाहिरातीचा चेहरा नाही आहात, असे बरेच अनुभव आले. रिजेक्शन व्हायचं तेव्हा खूप रडू यायचं. मला कळायचं नाही की माझ्यासोबत नेमकं काय घडतंय? त्यावेळी कुठेतरी असं ठरलं होतं. हिरोईन म्हणजे बारीक, सरळ केस असलेली आणि ती एकाच वाक्यांमध्ये एकाच स्टाईलमध्ये बोलणार, हे ठरलेलंच होतं. कोणताही चॅनेल लावला तर सगळ्या नायिका तशाच दिसायच्या."
यानंतर पुढे शेवंताचं पात्र अपूर्वाला कसं मिळालं तो किस्सा सांगताना तिने म्हटलं,"मला तर काहींनी असंही जाड आहेस असं म्हटलं. त्यानंतर मी बराच वेळ घेतला आणि बारीक झाले. मग शेवंताचं पात्र माझ्याकडे आलं. त्यासाठी त्यांनी मला वजन वाढवायला सांगितलं. त्या भूमिकेसाठी मी जवळजवळ तेरा ते चौदा किलो वजन वाढवलं. जेव्हा मला त्या पात्राबद्दल कळलं तेव्हा वाटलं की याच्यासाठीच मी अट्टाहास केला होता. साधारण तीन वर्ष ही मालिका चालली. २०१७ मध्ये ती मालिका आली होती पण, आजही लोक तितकंच प्रेम करतात." अशा भावना अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या आहेत.