"१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनले अन्...", मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:33 IST2025-08-13T11:29:23+5:302025-08-13T11:33:12+5:30
मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; म्हणाली...

"१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनले अन्...", मराठी गायिकेची तेजश्री प्रधानसाठी खास पोस्ट; व्यक्त केल्या भावना
Savaniee Ravindra Post: नुकतीच झी मराठी वाहिनीवर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली वीण दोघांतली तुटेना प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काल ११ ऑगस्टपासून या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. दरम्यान, या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री प्रधानने झी मराठीवर कमबॅक केलं आहे. त्यामुळे आता या मालिकेत नक्की काय पाहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. या मालिकेत तेजश्री प्रधान ही स्वानंदी सरपोतदार आणि सुबोध भावे समर राजवाडे नावाचं पात्र साकारत आहेत. अशातच या मालिकेच्या निमित्ताने मराठमोळी गायिका सावनी रविंद्रने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, गायिका सावनी रविंद्रनेसोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तेजश्री प्रधानला तिच्या या मालिकेसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. सावनी रविंद्रने 'वीण दोघांतली ही तूटेना' मालिकेचं शीर्षकगीत गायलं आहे. याशिवाय तिने याआधी तेजश्री प्रधानच्या 'होणार सून मी या घरची' मालिकेचं टायटल सॉंग गायलं होतं. त्यानंतर जवळपास १२ वर्षानंतर सावनी तेजश्रीच्या या मालिकेसाठी गायनाची संधी मिळाली. याचदरम्यान तिने खास पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय, "योगायोग!!! 12 वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून घराघरात पोहोचले..., "होणार सुन मी या घरची" या मालिकेने आणि त्यातल्या गाण्यांनी इतिहास घडवला... त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तेजूसाठी पुन्हा गाण्याचा योग आला... निमित्त होतं,"वीण दोघातली ही तुटेना" या झी मराठी वरील सुरू झालेल्या नवीन मालिकेच्या शीर्षकगीताचं!"
पुढे सावनीने लिहिलंय, "इतिहासाची पुनरावृत्ती होवो हीच मोरया चरणी प्रार्थना! आणि हो...मालिकेचं शीर्षकगीत ऐकून तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि पाहत रहा..."वीण दोघातली ही तुटेना" संध्याकाळी 7.30 वाजता सदैव आपल्या Zee मराठी वर!!!" अशा भावना गायिकेने या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचं शीर्षकगीत गाण्यासाठी सावनीला बिग बॉस फेम अभिजीत सावंतची देखील साथ लाभली आहे.