Vandana Gupte : 'क्योंकी की सास भी कभी बहू थी'ची वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर! मग का दिला नकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:39 IST2025-07-10T11:37:29+5:302025-07-10T11:39:23+5:30
Vandana Gupte : "मला खूप प्रेशराईज करण्यात आलं, पण...", 'क्योंकी की सास...' साठी वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर, खुलासा करत म्हणाल्या...

Vandana Gupte : 'क्योंकी की सास भी कभी बहू थी'ची वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर! मग का दिला नकार?
Vandana Gupte : चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारे काही मोजकेच कलावंत आहेत, त्यापैकी एक म्हणजे वंदना गुप्ते (Vandana Gupte). वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट, नाटक यातून त्यांनी आपलं अभिनयपैलूत्व सिध्द केलं. आपल्या दर्जेदार व कसदार अभिनयाने छाप उमटविणाऱ्या चतुरस्र अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या 'कुटुंब कीर्तन' नाटकामुळे खूप चर्चेत आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांना बहुचर्चित 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वलसाठी विचारण्यात आलं होतं, असा खुलासा केला आहे.
नुकतीच वंदना गुप्तेंनी अमोर परचुरेंच्या 'कॅचअप मराठी'ला मुलाखत दिली. त्यामध्ये 'क्योंकी सास भी कभी बहु थी' च्या सीक्वलमध्ये एका मराठी भूमिकेसाठी त्यांना ऑफर देण्यात आल्याचा खुलासा केला आहे. शिवाय या मुलाखतीमध्ये रंगभूमीविषयी प्रेमही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्याविषयी बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या, "प्रत्येक कलाकाराने नाटक एकदा करावचं. कारण टीव्हीमध्ये काहीच नाही. आताच जे क्योंकी सास भी कभी बहू थी परत येतं आहे त्यासाठी मला विचारण्यात आलं. मी तेव्हा म्हटलं की, आता हे नाटक मी घेतलंय तर नाही करता येणार! कारण, नाटकाची कमिटमेंट संसाराची कमिटमेंट आणि मालिकेची कमिटमेंट हे फार वेगळं आहे. त्यात टीव्हीवाल्यांना नाटकाविषयी काही आस्था नाही, आम्ही त्यासाठी किती कष्ट घेतो याबद्दल त्यांना काहीच पडलेलं नसतं. मी जेव्हा मराठी-हिंदी मालिका आणि नाटक करत होते तेव्हापासूनच मला ब्लड प्रेशरची गोळी चालू करावी लागली. कारण, दिलेल्या वेळात थिएरमध्ये वेळात पोहचणं हे सगळं खूप धावपळीचं काम असतं."
मला विचारण्यात आलं होतं पण...
त्यानंतर वंदना गुप्ते म्हणाल्या,"क्योंकी सास भी कभी बहू थी' साठी मला विचारण्यात आलं होतं. खूप मला प्रेशराईज करण्यात आलं की तुम्ही करा म्हणून, शिवाय त्यासाठी मला अनेक जणांचे फोन आले होते. या भूमिकेसाठी वंदना गुप्ते पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. ते एक मराठी कॅरेक्टर होतं. 'तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, आम्ही तुमची काम पाहिली आहेत', असं ते म्हणाले. पण, मी त्यासाठी फार फार ५ दिवस देऊ शकत होते. त्याच्याशिवाय मला शक्य नव्हतं. कारण नाटकाची कमिटमेन्ट फार मोठी असते. तुमच्या आयुष्यात काहीही होवो तुम्हाला नाटकाचा प्रयोग कॅन्सल नाही करता येत." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला.