"आई गोरी, वडील गोरे आणि मी एकटीच काळी...", स्वाती चिटणीस यांना वाटायचा दिसण्याचा कॉम्प्लेक्स, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:37 IST2025-09-30T10:36:38+5:302025-09-30T10:37:14+5:30
उत्तम अभिनेत्री असलेल्या स्वाती यांना लहानपणापासूनच त्यांच्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्स होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.

"आई गोरी, वडील गोरे आणि मी एकटीच काळी...", स्वाती चिटणीस यांना वाटायचा दिसण्याचा कॉम्प्लेक्स, म्हणाल्या...
स्वाती चिटणीस या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मालिका आणि सिनेमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका बजावल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही त्यांनी अभिनयाची छाप उमटवली. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसल्या. उत्तम अभिनेत्री असलेल्या स्वाती यांना लहानपणापासूनच त्यांच्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्स होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं.
स्वाती चिटणीस यांनी आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मला लहानपणापासून माझ्या दिसण्याबद्दल इतका कॉम्प्लेक्स होता. कारण, माझ्या घरी सगळे गोरे होते. आई गोरी, माझे वडील गोरे आणि मी एकटीच काळी... म्हणजे मला माझा मामा असा चिडवायचा की तू लहान असताना एका म्हशीने तुझ्या नाकावर पाय दिला. माझ्या आईच्या आईने मला असं सांगितलं होतं की आमच्याकडे एक भिकारीण आली होती आणि तिने तुला दिलं. हिला घ्या आणि मला भाकरी द्या. मग तुझ्या मम्माने तुला ठेवून घेतली म्हणून बघ तू किती वेगळी आहेस. तू कशी काळी, तुझी मम्मा कशी गोरी वगैरे...".
लहानपणीचा एक किस्साही स्वाती यांनी मुलाखतीत सांगितला. "तेव्हा मी तीन साडेतीन वर्षांची असेन. माझी आई नोकरी करायची. आई शाळेतून आली आणि मी तिला विचारलं की आई गं माझी खरी मम्मा कुठे असेल आता? माझी आई म्हणाली खरी मम्मा म्हणजे काय? मी म्हटलं जी भिकारीण मला ठेवून गेली ती कुठे असेल? माझ्या आईला धक्का बसला. मी म्हटलं मला माईने सांगितलं. मग आई माईला जाऊन इतकी ओरडली होती. तर माई म्हणाली अगं गंमत केली तिची...ते खरं थोडी आहे. पण मी ते सिरियसली घेतलं. त्यामुळे मला आजही कोणी सांगितलं की तू खूप छान दिसतेस. तर मला असं खूप awkward होतं", असं त्यांनी सांगितलं.